मिरासदारी हरपली

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मिरासदारी हरपली

ज्यांच्या ग्रामीण विनोदाने सार्या महाराष्ट्राला खदाखदा हसवले आणि कथाकथनाने सार्या लोकांना भुरळ घातली असे ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. ग्रामीण विनोद असे म्हटले असले तरीही त्यांचा विनोद ग्रामीण नव्हता तर त्यातील पात्रे ग्रामीण भागात रहाणारी होती. विनोद तर अस्सल आणि दर्जेदारच होता. मिरासदार यांचा साहित्यविश्वात उदय त्याच काळात झाला ज्या काळात मराठी कथा केवळ शहरी भागात अडकली होती. म्हणजे नायक नायिका सायंकाळी छान तयार वगैरे होऊन टेनिसची रॅकेट हातात घेऊन बाहेर पडायची, रेडिओवर भावगीते ऐकायची आणि छोट्याशा कारणावरून रूसलेल्या नायिकेची नायक मनधरणी करायचा. मध्येच नायकाला आपला साम्यवाद आठवायचा आणि तो श्रीमंती जगण्यावर थोडीशी टिका करायचा आणि पुन्हा आपल्या श्रीमंतीचा उपभोग घेण्यास तयार व्हायचा. असल्या कथाभागात अडकलेल्या आणि गुदमरलेल्या कथेला मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांनी ग्रामीण भागात नेले. ग्रामीण कथा असली तरीही त्यातील जीवनाचे दाहक वास्तव विनोदाच्या वेष्टनात घालून वाचकांना सादर केले. त्यामुळे असेही जीवन असते, याचे प्रथमच दर्शन फडके आणि खांडेकर यांच्या तकलादू विश्वात रमलेल्या मराठी वाचकाला घडले. मराठी वाचक या तीन लेखकांच्या कथांमुळे खाडकन जाग यावी, तसा जागा झाला. त्यात मिरासदार यांची कथा वेगळीच होती. तिनेही ग्रामीण भागातील गरिबीचे दर्शन हसतखेळत घडवले आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांचे अज्ञान बिनधास्तपणे व्यक्त करणारा स्वभावही तितकाच दिलखुलासपणे दाखवला. एकच उदाहरण पुरेसे आहे. मिरासदार यांची प्रदर्शन नावाची गोष्ट आहे. त्यात प्रथमच विमानातून प्रवास करणारा पाटील म्हणतो की तोंडातून पिचकारी टाकायची होती. पण खिडकीची काच निघत नव्हती. दोन चार बुक्क्या हाणून काच फोडू आणि काय शंभर दोनशे रूपयांचे नुकसान झाले तर देऊन टाकू, असा विचार करणारा पाटील हा निरागस अज्ञानी आहे. नाना चेंगट, बाबू पैलवान, शिवा जमदाडे, रामा खरात आणि गणा मास्तर ही कायमस्वरूपी पात्रे आणि भोकरवाडी हे गाव मिरासदारांनी साहित्यात अजरामर केले आहे. ही पात्रे जेव्हा रात्रि गणामास्तरच्या बैठकीत एकेक तत्वज्ञान सांगतात, ते वाचून हसण्याबरोबर ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहचलीच नव्हती, याचीही साक्ष पटते. बाबू पैलवानला तर प्रत्येक नवीन गोष्टीत सहभाग घ्यायचा असतो आणि त्याला साथीदार केवळ नाना चेंगट मिळतो. नंतर दोघांची जी काही फजिती होते, ती वाचून हसायला तर येते. पण त्यांच्यासारख्या निष्पाप विचारसरणीच्या लोकांना तत्कालिन राज्यकर्त्यांनी कसे फसवले होते, याचेही प्रातिनिधिक दर्शन घडते. मिरासदारांचा विनोद हा हसवणारा तर आहेच. परंतु डोळ्यात अंजन घालणारा आहे. तत्कालिन राज्यकर्त्यांवर नाव न घेता एक जहरी भाष्य याच निष्पाप पात्रांच्या माध्यमातून मिरासदार करतात. तेव्हा त्यांना सामाजिक धुरिणांना काही तरी सांगायचे आहे, हे जाणवते. मिरासदारांच्या सार्याच कथा विनोदी नाहित, पण गंभीर कथाही सामाजिक विषमतेवर उत्तम भाष्यकार आहेत. केवळ पहाण्याची दृष्टि हवी. मिरासदारांनी अनेक विषय हाताळले आहेत. लस टोचून घेण्यासंदर्भात ग्रामीण लोकांमध्ये असलेली भीती ही उपाय या गोष्टीत दिसते. तर वर्गात देखण्या चेहर्याचा विद्यार्थी असेल तर त्याची आईही तशीच सुंदर असेल म्हणून तिच्याशी जुळवण्याचा प्रयत्न करणारा इरसाल मास्तर दळण या गोष्टीत आहे. मात्र त्या मुलाची आई ज्या कावेबाजपणे शेजारच्या म्हातारीला सहाय्याने त्या मास्तरला पीठ दळायला बसवते, ही कथा म्हणजे मिरासदारांच्या ग्रामीण लोकांना भोळेभाबडे समजू नका, असा शहरी लोकांना संदेशच आहे. अशा अनेक कथा आहेत, ज्यात निखळ विनोद आहे, पण कळत नकळत एक संदेश मिरासदार देतात. मिरासदारांनी कथेला ग्रामीण भागात नेऊन तिचे वैभव वाढवले, हे सत्य आहे. याचा अर्थ मिरासदारांना शहरी कथेचे वावडे होते, असे नाहि. त्यांनी शहरी विनोदाचे उत्तम प्रदर्शन घडवले आहे. पण पंढरपूरसारख्या भागात लहानपण गेलेल्या मिरासदारांना ग्रामीण कथाच आपली वाटते, हे मात्र खरे. टीव्ही, मोबाईल, जास्तीची वर्तमानपत्रे, समाजमाध्यमे नसलेल्या त्या काळात साहित्य हेच एकमेव वलयांकित साधन होते. त्याचा पुरेपूर उपयोग मिरासदारांनी करून घेतला आणि त्यातून ग्रामीण भागाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड वगैरे त्यांच्या गोष्टीत ग्रामीण भागात शिक्षणाबद्दल असलेली अनास्था अत्यंत विनोदी पद्धतीने मांडली आहे. तर दुसर्या एका गोष्टीत पोलिसांची खाबूगिरीची प्रवृत्ती अत्यंत तीक्ष्णपणे मांडली आहे. शिवाजीचे हस्ताक्षर या गोष्टीत तर निरागस बालकाच्या माध्यमातून मिरासदार यांनी तेव्हाच्या समाजात उफाळलेल्या निरर्थक वादांत शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्वाचे खरे महत्व लोकांनी कसे ओळखले नव्हते, यावर मिश्किल टिप्पणी आहे. मिरासदार हे साहित्यिक असल्याने त्यांच्या साहित्यसंपदेचेच मूल्यांकन व्हायला हवे. त्यांनी नाटके आणि कादंबर्याही लिहिल्या. पण त्यात ते रमले नाहित. त्यांचा सारा रस विनोदी लेखनातच होता. लोकप्रियतेच्या बाबतीत मिरासदार हे पहिल्या फळीतील होते. पण त्यांच्या कथांचा ग्रामीण बाज असल्याने ते वेगळे पडले होते. पण मिरासदार म्हणतात त्याप्रमाणे त्यांचा स्वतःचा विनोद हा चिं वि जोशी यांच्या शैलीच्या जवळ जाणारा होता. पु ल देशपांडे यांचा विनोद कोटीबाज होता. पण त्यामुळे तो मराठी लोकांनाच समजू शकतो. पण प्रसंगनिष्ठ विनोद हा प्रत्येक प्रकारच्या लोकांना समजू शकतो. हे त्यांचे विश्लेषण अत्यंत योग्य आहे. एक उदाहरण सांगायचे तर नाना चेंगट जेव्हा गणामास्तरच्या बायकोला विचारतो की गणा कुठे आहे. ती उत्तर देते, आताच गेलेत आंघोळीला. अर्धा घंटा झाला असेल. ही चिं वि जोशींची विनोदाची शैली आहे. मिरासदार यांनी लेखनाचा प्रत्येक प्रकार हाताळला आणि त्यात त्यांना अमाप यश मिळाले. ते प्राध्यापक होते. पण त्यांच्या कथांमध्ये रूक्ष प्राध्यापकी कधीच डोकावली नाहि. मिरासदारांच्या निधनाने महाराष्ट्राला हसवणारा आणि त्यातील सामाजिक व्यंगावर नेमकेपणाने बोट ठेवणारा एक साहित्यिक आपण गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.