पुन्हा ११ सप्टेंबर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुन्हा ११ सप्टेंबर

बरोबर २० वर्षांपूर्वी म्हणजे ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर या जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक मानल्या जाणारी जुळी टॉवर्स अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली विमाने आदळवून उध्वस्त केली. यात २७५३ लोक ठार झाले. हल्ला घडला तेव्हा ती सकाळची वेळ होती अन्यथा आणखी मनुष्यहानी झाली असती, असे सांगितले गेले. नंतर पेंटॅगॉन या अमेरिकन संरक्षण खात्याच्या जगप्रसिद्ध इमारतीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण तो उधळून लावण्यात अमेरिका यशस्वी झाली. त्या हल्ल्याने अमेरिकेच्या एकूणच स्वसंरक्षणाबाबत आणि अत्यंत आधुनिक यंत्रणा असल्याच्या गर्वाचा फुगा फुटला. अर्थात त्यानंतर अमेरिकेने अल कायदाला आसरा देणार्या अफगाणिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टिने त्या देशात जाऊन अल कायदाचे तळ उध्वस्त केले. तालिबानचा पराभव केला आणि त्यांना हुसकावून लावले. अमेरिकेपुढे अल कायदा आणि तालिबानचा काहीच टिकाव लागला नाहि. त्यांनंतर २० वर्षे अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानात होते  आणि अफगाण लोक आरामदायक जीवन जगत होते. आधुनिक सुधारणांचा लाभ घेत होते. पण २० वर्षांनंतर आता पुन्हा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या २० वर्षांत अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या भयानक पंज्याखाली चिरडला गेला आहे. पुन्हा महिला बुरख्यात गेल्या आहेत आणि एकेकाळी आधुनिक आणि संपन्न असा हा देश पुन्हा वैराण आणि उजाड झालेला दिसेल. ज्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याचे निमित्त करून अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसून तालिबानचे पारिपत्य केले, त्या अमेरिकेने अफगाण नागरिकांना फसवले आहे. तिने अचानक माघार घेऊन अफगाण नागरिकांना वार्यावर सोडले. तालिबानशी झालेल्या करारानुसार अफगाणिस्तान सोडण्यासाठी अमेरिकेला ३१ ऑगस्टची मुदत होती. बरोबर त्या दिवशी रात्री अमेरिकेच्या शेवटच्या सैनिकाने काबूल सोडले. आता अफगाणिस्तानात अंधारयुग अवतरले आहे आणि त्यासाठी केवळ अमेरिका जबाबदार आहे. अमेरिकेने अफगाण नागरिकांसमोर अफगाण सेना तालिबानशी किमान सहा महिने लढू शकेल, अशा फुशारक्या मारल्या होत्या. पापणी मिटायच्या आत या सेनांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केले आणि अध्यक्ष अशरफ गनी तर पैसे आणि हेलिकॉप्टर घेऊन संयुक्त अरब अमिरातीत पळून गेला. अशरफ गनी आणि त्याच्या आधीचा हमिद करझाई हे दोघेही अमेरिकेचे बिनकण्याचे बुजगावणे असल्याचे सिद्ध झाले. वर्ल्ड ट्रेड सेंटर घटनेनंतर अमेरिकेवर एकही दहशतवादी हल्ला होऊ शकला नाहि, असा दावा केला जातो. त्यात तथ्य आहेच. पण अमेरिका स्वतःच्या देशातील सुरक्षेबाबत इतकी जागरूक झाली असताना अफगाणिस्तानच्या बाबतीत मात्र त्या नागरिकांच्या जिवाशी खेळली आहे. मोठमोठ्या बाता मारून अमेरिकेने काबूलमधून पळ काढला. वास्तविक अमेरिकन सैन्य असेपर्यंत अफगाणिस्तानवर कब्जा करण्याची तालिबानची हिमत झाली नाहि. अफगाण नागरिक एका स्वप्नात दंग होते. अचानक अमेरिकेने त्यांचा विश्वासघात करून त्यांना संकटाच्या खाईत ढकलले आहे. डब्ल्यूटीसी हल्ल्याचे निमित्ताने अमेरिका अफगाणिस्तानात घुसली आणि अब्जावधी डॉलर्स आणि हजारो जीव गमावून मिळवले काय, तर केवळ माघार. तीही यशस्वी नाहि तर तालिबानने दहा दिवसात अफगाणिस्तानवर परत कब्जा मिळवला. अर्थात अमेरिकेने त्यांना तसा तो मिळवू दिला, हे नाकारता येणार नाहि. अमेरिकेला यात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामुळे अमेरिका अफगाणिस्तानला पुन्हा खंबीरपणे उभी करू शकली नाहि. दिर्घ मुदतीची आणि शाश्वत सुधारणा घडवून आणण्यात अमेरिकेला साफ अपयश आले. प्रचंड लाचखोरी त्यातून बोकाळली. अमेरिकन परराष्ट्र खात्याने अफगाणिस्तानची फेर उभारणी करायची होती, परंतु त्यांच्याकडे लागणारे तज्ञ आणि साधनसंपत्ती नव्हती. कामाची विभागणी योग्य तर्हेने न झाल्याने अफगाणिस्तानच्या फेरउभारणीत कायमच्या त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे आता अफगाण परत उभे राहू शकणार नाहि. केवळ पैसा ओतत राहिल्याने अफगाणिस्तानची उभारणी करता येईल, या भ्रमात अमेरिका राहिल्याने केवळ लाचखोरी आणि भ्रष्टाचार बोकाळला. इतकी ढिसाळ व्यवस्था असल्यावर कोणत्याही सैन्याविरोधात ती क्षणात कोसळणार होतीच. अमेरिकेने आपल्यावरील हल्ल्यासाठी अल कायदाला आसरा देणार्या अफगाणिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्या देशात घुसखोरी केली. पण मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार पाकिस्तानी अतिरेकी हाफिज सईदला आपल्या ताब्यात देण्यासाठी भारत प्रयत्न करत असताना भारताला उंटावरून शेळ्या हाकत शहाणपणा शिकवत आहे. आता तर पाकिस्तानच्या मदतीने तालिबानच सत्तेत आल्याने या दोन दुष्ट शक्ति एक झाल्या आहेत. त्यामुळे सर्वात भयंकर धोका निर्माण झाला आहे तो भारताला. त्यामुळे अमेरिकेने अशा वेळेस माघार घेतली आहे की भारताला आता कश्मिर आघाडीवर जास्त सजग रहावे लागेल. अर्थात भारत आपल्या देशाच्या संरक्षणासाठी कुणाचा मोहताज नाहि, हा  भाग वेगळा. भारत स्वसंरक्षणासाठी तयार आहे आणि त्याच्याकडे कुणी डोळा वाकडा करून पाहिले तर काय होते हे बालाकोट हवाई हल्ल्यांवरून दाखवून दिले आहे. अमेरिका आज जेव्हा मागे वळून पहात असेल तेव्हा ती काय विचार करत असेल, हे सांगणे सोपे आहे. २० वर्षांत अमेरिकेने अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार केले आणि समुद्राच्या तळाशी गाडून सूड घेतला. अफगाणिस्तानातून तालिबानला पळवून लावले आणि आता त्याच अमेरिकेने माघार घेतल्याने पुन्हा तालिबान तेथे सत्तारूढ झाले आहे. म्हणजे परत अमेरिका ग्राऊंड झिरोवर आली आहे. २० वर्षांनंतर अमेरिकेला प्रचंड पैसा आणि सैनिकांचे जीव गमावून काहीच मिळाले नाहि. अमेरिकेच्या या अपयशाची ही कहाणी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नवीन इमारती सांगतील.