विकास कामात अडथळे येऊ देणार नाही- मुख्यमंत्री

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विकास कामात अडथळे येऊ देणार नाही- मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकास कामाच्या आड कोणालाही येऊ देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. नागपुरातील मेट्रो फ्रिडम पार्क स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात व्हीडीओ लिंकद्वारे सहभागी होताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते विकास कामात अडथळे घालताहेत. यासंदर्भात नितीन गडकरींनी 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून शिवसेनेच्या नेत्यांना आवर घालण्याची विनंती केली होती. यापार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘नितीनजी तुम्ही गोष्टी खूप प्रेमळ करता. पण पत्र खूप कडक लिहीता’ असा उल्लेख करीत विकासाच्या आड कोणाला येऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. आपण दोघेही कर्तव्य कठोर आहोत. शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की जनतेशी कधीही विश्वासघात व गद्दारी करायची नाही. जनतेच्या कामात कुठलाही अडथळा येऊ द्यायचा नाही. हीच शिकवण तुम्ही आणि आम्ही घेतली आहे. नागपूर उपराजधानी म्हटल्यानंतर जगातील सर्वोत्तम शहरात त्याची गणना व्हावी यासाठी आमचेही प्रयत्न आहेत. माणसे जोडताना राजकीय जोडे बाहेर काढून येतो, हीच आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. विकासाच्या मार्गात कारभाराचे स्पीड ब्रेकर येऊ देत नाही. प्रगती आणि विकास जलद गतीने साधण्यासाठी मार्ग आणि महामार्गाचे जाळे विणत आहोत. त्यात उणीवा वा त्रूटी राहू नयेत. प्रत्येक पावलावरती प्रत्येक क्षणी आपण सोबत आहोत, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी गडकरी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रोचा शुभारंभ झाला. त्या नंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी याला गती दिली. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही कामे मार्गी लावली या बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशभरात कामे करीत असलो तरी मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे. मुंबई आणि ठाण्यातील विकास कामांसाठी अतिरिक्त एक लाख कोटी देण्याची तयारी आहे. यासाठी एमएसआरडीसीची मुंबईत बैठक बोलवा, असे गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने सोबत काम करू. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र बदलत आहे, असे कौतुकोद्गार गडकरींनी काढले. यावेळी सर्व उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी मेट्रोचा प्रवास केला.