लससाठा नसल्याने मोहिमेला फटका

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लससाठा नसल्याने मोहिमेला फटका

मुंबई : लशींचा साठा उपलब्ध नसल्याचा चांगलाच फटका मुंबईतील लसीकरणाला बसला आहे. शुक्रवारी लससाठा न मिळाल्यामुळे शनिवारीही लसीकरण बंद राहणार आहे. शुक्रवारपासून सलग तीन दिवस लसीकरण बंद असल्यामुळे लस घेण्यासाठी मुंबईकरांना आता सोमवारची वाट पाहावी लागणार आहे.

नव्या लसीकरण धोरणानुसार लशींचा साठा मोठ्या प्रमाणात पुरविण्याचे आश्वासन केंद्राने दिले असले तरी काहीच दिवसांत पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा लशींचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी, मुंबईत १ जुलैला लसीकरण बंद ठेवण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा गुरुवारी लशींचा साठा संपल्याने शुक्रवारी लसीकरण बंद होते. लस प्राप्त न झाल्यामुळे शनिवारी लसीकरण बंद राहणार आहे. आठवड्याची सुट्टी म्हणून रविवारी लसीकरण केले जात नाही. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी लसीकरण बंद राहील, असे पालिकेने जाहीर केले आहे.

गेल्या आठवड्यात तर दोन दिवस तीनच तास लसीकरण केले गेले आणि एक दिवस ते बंदच होते. साठा नसल्यामुळे लशीची दुसरी मात्रा हवी असलेले अनेक जण ताटकळत राहिले आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘लशींचा साठा अधिक प्रमाणात देण्याची मागणी आम्ही वारंवार करत आहोत. वेगाने लसीकरण करण्याची आमची तयारी असूनही पुरेसा साठा नसल्यामुळे अनेक केंद्रांवर क्षमतेपेक्षा कमी साठा द्यावा लागतो. त्यामुळे नागरिकांना लस न घेताच परत जावे लागते. ही स्थिती बदलण्यासाठी जास्तीचा साठा एकाच वेळी देण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे,’ असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

शुक्रवारी लसीकरण बंद असले तरी सकाळपासून केंद्रावर येऊन अनेक लोक चौकशी करत होते. निर्बंध असतानाही प्रवास करून येणारे नागरिक संतप्त होऊन वाद घालतात. परंतु आमचाही नाइलाज असतो, असे अंधेरीच्या लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले.