आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं- अजित पवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं- अजित पवार

पुणे -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या कोल्हापूर इथून मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाविषयी अजित पवारांनी भाष्य केलं आहे. आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन संभाजीराजेंना केलं होतं, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

उद्या कोल्हापुरात होणाऱ्या मूक आंदोलनाबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, संभाजीराजे यांनी आंदोलन करण्याऐवजी त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. त्यांनी आंदोलन करावं पण करोना वाढणार नाही याची काळजी घेऊन करावं. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच हसन मुश्रीफ हेही सहभागी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे त्यावर जुलै रोजी होणाऱ्या राज्याच्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी समाजाला सांगितलं आहे. कोल्हापुरात शाहू समाधीस्थळावरुन ते संवाद साधत होते.