चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं करोनामुळे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं करोनामुळे निधन

ऋषिकेश :  चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि 'हिमालयाचे रक्षक' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी
सुंदरलाल बहुगुणा यांचं आज निधन झालं. कोरोना संसर्गामुळे त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर ऋषिकेशच्या
एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. सुंदरलाल बहुगुणा यांना 8 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे
त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बहुगुणा हे 94
वर्षाचे होते. त्यांच्या निधनावर उतराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
आयुष्यभर त्यांनी हिमालयाच्या संरक्षणासाठी आंदोलन केलं. त्यामुळे त्यांना 'हिमालय रक्षक' म्हणूनही संबोधलं
जातं. 1980मध्येच त्यांनी टिहरी धरणविरोधी चळवळही सुरू केली होती. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन
भारत सरकारने त्यांना 1980मध्ये 'पद्मश्री' आणि 2009मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्कार देऊन गौरवलं होतं.
सुंदरलाल बहुगुणा हे महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावीत होते. त्यांनी आयुष्यभर गांधीवादाचा अंगिकार केला.
त्यांच्या आंदोलनातून वेळावेळी गांधीवाद डोकवायचा. 70च्या दशकात त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मोठी
चळवळ सुरू केली होती. देशभर या चळवळीचा परिणाम झाला.
याच काळात त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी चिपको आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची जगानेही दखल घेतली होती.
वृक्षतोडीविरोधातील हे आंदोलन होतं. मार्च 1974मध्ये शेकडो स्थानिक महिला वृक्षतोडीचा निषेध म्हणून झाडाला
चिपकून उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिपको आंदोलन म्हणून गाजलं.
उत्तराखंडच्या टिहरी येथे 9 जानेवारी 1927 रोजी बहुगुणा यांचा जन्म झाला होता. त्यांनी केवळ पर्यावरणावरच
नाही तर अस्पृश्यतेविरोधातही आंदोलन केलं. त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नावरही आवाज उठवला. गांधीजींपासून प्रेरणा
घेऊन त्यांनी 'हिमालय बचाव'चे काम सुरू केलं.