आचार्य अत्रे कलाकार 2021 च्या पुरस्काराची मानकरी ठरली अभिनेत्री श्रेया बुगडे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आचार्य अत्रे कलाकार 2021 च्या पुरस्काराची मानकरी ठरली अभिनेत्री श्रेया बुगडे

आपण केलेल्या कामाची दखल घेतली जावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग ही दखल कधी पुरस्काराच्या रुपात घेतली जाते तर कधी कोणी शाब्दिक कौतुकाची थाप जरी दिली तरी सुद्धा काम करण्याचं बळ वाढतच असते. एखाद्या ठिकाणी पोहोचायचा प्रवास हा सोपा नक्कीच नसतो. पण आपण जर सातत्याने कष्ट घेतले आणि या कष्टाचे कोणाकडून कौतुक झाले आणि त्याची दखल घेतली गेली तर आपला प्रयत्नांचा आणि ध्यासाचा वेग दुप्पट गतीने वाढतो हे देखील तितकेच खरे आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी केलेल्या कामाच्या कौतुकासाठी बरेच पुरस्कार दिले जातात. आणि त्याच पुरस्कारांपैकी एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे 'आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार'. यावर्षीचा हा पुरस्कार मिळाला आहे आपली सर्वांची लाडकी श्रेया बुगडे हिला. श्रेयाने या पुरस्काराची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना दिली आहे. या पोस्टसाठी तिने कॅप्शन ही अगदी अचूक लिहिले आहे. ते पाडगांवकरांनी लिहीलंय ना, सुख म्हणजे नक्की काय असतं?. आणि माझ्या वाट्याला आलेलं सगळ्यात मोठं सुख म्हणजे आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार 2021. या पुरस्कार हातात घेतलेला एक फोटो श्रेयाने इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. यामध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली आहे आणि ती कमालीची समाधानी, सुखी आणि आनंदी दिसत आहे.

आचार्य अत्रे हे मराठीतले लेखक, कवी, विडंबन कवी, नाटककार, पत्रकार, शिक्षक होते. त्यांच्या नावे बरेच पुरस्कार विविध क्षेत्रातील लोकांना दिले जातात. आणि यावर्षीचा कला क्षेत्रातील पुरस्कार छोट्या पडद्यावरील श्रेया बुगडे हिला मिळाला आहे. चला हवा येऊ द्या या शो मधून श्रेया महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेच. त्याचप्रमाणे श्रेया लहानपणापासूनच नाटकांमध्ये काम करायची. अभिनेत्री बनणे हेच तिचे एक स्वप्न होते. आणि त्या स्वप्नासाठी ती झटत राहिली, परिश्रम करतच राहिली.