लस उपलब्धतेसाठी केंद्राने हस्तक्षेप करावा – टोपे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लस उपलब्धतेसाठी केंद्राने हस्तक्षेप करावा – टोपे

जालना : राज्यातील लसीकरण अधिक गतीने व्हावयाचे असेल तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून आवश्यक असलेला लशींचा साठा उपलब्ध करवून दिला पाहिजे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

जिल्ह्य़ातील भोकरदन, राजूर, मंठा, घनसावंगी, अंबड इत्यादी ठिकाणी करोना उपचार करणाऱ्या रुग्णालयांना टोपे यांनी रविवारी संबंधित अधिकाऱ्यांसह भेट देऊन यंत्रणेची पाहणी केली. या दौऱ्यात वार्ताहरांशी बोलताना टोपे म्हणाले,की ४५ वर्षांच्या वरील वयोगटातील लसीकरण आणखी अधिक गतीने होण्याची आवश्यकता आहे. कोव्हॅक्सिन लशीच्या दुसऱ्या डोससाठी नागरिक प्रतीक्षेत आहेत. हा पुरवठा केंद्राकडून लवकरात लवकर व्हावा यासाठी राज्य प्रयत्नशील आहे. जर पुरवठय़ात विलंब झाला तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही काळ थांबवून त्याऐवजी ४५ वर्षांच्या वरील व्यक्तींना दुसरा डोस देण्यास प्राधान्य देण्यात येईल. केंद्राने उपलब्धता करून दिली तर राज्य शासन लस खरेदीसाठी तयार आहे.

१५ मे नंतर राज्यातील सध्याचे निर्बंध चालू राहतील किंवा नाही या संदर्भात आताच बोलणे योग्य नाही. तज्ज्ञ, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य विभाग करोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. १५ मेच्या आसपास असलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने या संदर्भात विचार होईल. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. तालुका पातळीवरील खासगी रुग्णालयात करोना उपचाराच्या संदर्भातील दर अधिक जाणवत असल्याचे काही मंडळींनी सांगितलेले आहे.

खासगी रुग्णालयातील बिल  शासनाच्या आदेशापेक्षा अधिक आकारले जाऊ नये यासाठी तपासणी करणारे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी अधिकारी कमी पडत असतील तर शिक्षकांना एक दिवसाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून खासगी रुग्णालयांतील बिलांचे लेखापरीक्षण करून घेता येऊ शकेल, असेही टोपे  यांनी  सांगितले.