... हा तर वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार - प्रवीण दरेकर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

... हा तर वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार - प्रवीण दरेकर

मुंबई :  माझे वक्तव्य नीट ऐकले असते तर त्याचा अर्थ कळला असता, पण हे दुसरं काही नाही तर वड्याचं तेल वांग्यावर काढायचा प्रकार आहे. कारण अशा वक्तव्यांमुळेचे त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते. त्यामुळे आपण अशा वक्तव्यांना फार महत्त्व द्यावे, असा आपल्याला वाटत नसल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिरुरमध्ये केल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही दरेकर यांच्या व्यक्तव्यावरून टीका केली होती. त्यावर बोलताना आज दरेकर म्हणाले, मी कुणाच्या वक्तव्याला फारसे महत्व देत नाही. गाल सर्वांनाच रंगवता येतात, कुणीही अतिरेकी भाषा करु नये, हे योग्य नाही. ती केवळ मराठीतील एक म्हण आहे. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले.

दरेकर म्हणाले, भाजप हा सर्वसामान्यांचा व तळा गाळ्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकावाल्यांचा, उद्योगपतींचा पक्ष असून अशाप्रकारे ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारे काही प्रवृत्तींचा पक्ष असल्याचे मी म्हटले होतो. राष्ट्रवादी पक्ष हा धनदांडग्यांना जवळ करणारा पक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे यामध्ये महिलांबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य मी केले नाही व तसे बोलायचं कारणही नव्हते, तसा विषयही नव्हता. त्यामुळे माझं वक्तव्य विरोधकांना नीट एकण्याची आवश्यकता आहे, असा टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला