जे घडलं, ते पूर्णपणे अनपेक्षित - मेरी कोम

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जे घडलं, ते पूर्णपणे अनपेक्षित - मेरी कोम

नवी दिल्ली : पदक जिंकता मायदेशी येणं मला अतिशय वाईट वाटतंय. दोन राऊंड सहजतेने जिंकल्यानंतर माझा कसा काय पराभव होऊ शकतो. रिकाम्या हाती आल्याबद्दल मी देशवासियांची माफी मागते. जे घडलं, ते पूर्णपणे माझ्यासाठी अनपेक्षित होतं, अशा शब्दांत मेरी कोमने मायदेशी परतल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
सहा वेळा विश्वविजेत्या मेरी कोमचे दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. टोक्यो ऑलिम्पिकच्या उप उपांत्यपूर्व मेरी कोमला रिओ ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती इंग्रीट व्हॅलेन्सियाने मात दिली. पराभव झाल्यानंतर ती मायदेशी परतली. तिचे भारतात आगमन होताच विमानतळावर प्रसार माध्यमांसमोर मेरीने देशवासियांची माफी मागितली आहे.
यावेळी ती म्हणाली की, सामना संपल्यानंतर मी आनंदाने रिंगण सोडलं. कारण मी जिंकल्याचं मला वाटत होते. मला डोपिंग टेस्टसाठी त्यांनी नेलं, तेव्हाही मी शांत होते. मात्र नंतर समाज माध्यमांवर आणि माझे प्रशिक्षक छोटेलाल यादव यांच्याकडून मी पराभूत झाल्याचं मला समजलं. मी या आधी दोनदा व्हॅलेन्सियाला हरवलं होते. त्यामुळे पंचांनी विजयी म्हणून तिचा हात उंचावला, यावर माझा विश्वासच बसेना.

दरम्यान मी या निर्णयाविरुद्ध काही बोलताही येत नव्हतं आणि निषेधही नोंदवता येत नव्हता. परंतु जगाने हे सर्व नक्की पाहिलंय, याची मला खात्री आहे. मी दुसरी फेरी जिंकले, मग अंतिम निकाल माझ्या विरोधात कसा काय जाऊ शकतो. जे घडलं, ते पूर्णपणे माझ्यासाठी अनपेक्षित होतं, असे म्हणत मेरी कोमने वाईट निर्णयासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बॉक्सिंग कृती दलाला जबाबदार धरले आहे.