सशक्त नाशिक जिल्ह्यासाठी नागरिकांची साथ गरजेची- पालकमंत्री

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सशक्त नाशिक जिल्ह्यासाठी नागरिकांची साथ गरजेची- पालकमंत्री

नाशिक  :  कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा करणे हे आपले पहिले उद्दिष्ट असणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची असेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. घोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर ठरली यामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या परिस्थितीत शासन- प्रशासनाने ऑक्सिजनचे यशस्वी नियोजन केले. एरव्ही जिल्ह्यात ८० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. ती आता मोठ्या प्रमाणात वाढली त्यातून नाशिक जिल्ह्यात सर्व रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण २९ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयांना २४ तास ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. कोरोना काळात डॉक्टर परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले मोलाचे योगदान दिले.
ते म्हणाले की, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने तिप्पट ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ३५० मेट्रिक टन ची व्यवस्था केली असून ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आपण निर्मिती करणार आहोत. ऑक्सिजन जनरेशन प्लांट सोबतच लिक्विड ऑक्सिजनचीही व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे साथरोगांच्या काळासह इतर काळातही रुग्णालयात नियमित ऑक्सिजन मिळणार आहे. जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक प्लांट सुरू करण्यात आले असून इतर प्लांटही लवकरच सुरू करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन सर्व उपाययोजना करत आहे. त्यात नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना करताना ते पुढे म्हणाले की, नाशिक मुंबई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे. या नाशिक मुंबई रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून रस्त्याच्या मजबुतीकरण करण्यासाठी मागणी केली आहे. तसेच अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली असून १५ ऑक्टोबर पर्यंत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत शासन मार्गक्रमण करत विकासाची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य देत असल्याचेगी त्यांनी सांगितले.