भारतीय अर्थव्यवस्था आत्मनिर्भर बनावी- सरसंघचालक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतीय अर्थव्यवस्था आत्मनिर्भर बनावी- सरसंघचालक

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था विकेंद्रीत आणि आत्मनिर्भर बनली पाहिजे. असे झाले तरच स्वराज्यासोबतच सुरज्य प्रस्थापित होईल. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई येथील विद्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, जगात माणसे सुखाच्या प्राप्तीसाठी जगतात. सुखातून आनंदाची प्राप्ती होत असून बहुतांश माणसे त्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. परंतु, भारतीय जीवनमूल्यांची पायाभरणी करणाऱ्या विद्वानांनी भौतिक सुखाऐवजी आंतरिक सुखाला अधिक महत्त्व दिले आहे. सुख ही आंतरिक भावना असून संतोषावर सुख निर्भर असल्याचे तत्त्वज्ञान सांगते. सुख वाटल्याने वाढत असून इतरांच्या सुखाची कामना केल्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होत असल्याचे सरसघचालकांनी सांगितले. सुखाच्या व्याख्येला धर्म आणि अर्थाशी जोडून डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले की, चाणक्याने सुखाचे मूळ धर्म, धर्माचे अर्थ आणि अर्थाचे मूळ इंद्रीय निग्रह असे सांगितल्याचे भागवत म्हणाले. आमच्या उपभोग या संकल्पनेत शोषण नव्हे दोहन निहीत आहे. उत्पादन खर्चावर आधारित लाभ आम्हाला अभिप्रेत आहे. अशा लाभापासून निर्मीत संपत्तीचे न्यायपूर्ण वितरण आमच्या संकल्पनेत निहीत असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही व्यवसायात भांडवल, श्रम, संसाधन, ग्राहक आणि राज्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे भागवत म्हणाले.
यावेळी सरसंघचालकांनी विकेंद्रीत आणि आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकला. परदेशात व्यक्तीला घटक मानले असून आमच्या येथे कुटुंब व्यवस्थेला सामाजिक आणि आर्थिक घटक म्हंटले जाते. आमची व्यवस्था अर्थ नव्हे तर व्यक्ती केंद्रीत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला परकीय दास्यत्वातून स्वातंत्र्य मिळाले असले तरी अजून आपण पूर्णपणे आत्मनिर्भर झालेलो नाही. देशाच्या सर्वांगिण विकासासाठी आर्थिक सामर्थ्य अत्यावरश्यक आहे. आर्थिक स्वयंपूर्णतेवरच इतर सुरक्षा अवलंबून असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. चीनचे उदाहरण देताना भागवत म्हणाले की, चीनी सामानाचा बहिष्कार करण्यासाठी आपण कितीही घोषणा दिल्या तरी तुर्तास आपली परिस्थिती वेगळी आहे. आपण इंटरनेट तंत्रज्ञान, उपकरणे आणि मोबाईलच्या बाबत चीनवर अवलंबुन आहोत ही वास्तविकता आहे. त्यामुळे अशा वस्तुंसाठी चीनच्या समोर मान तुकवावी लागते. जर हे टाळायचे असेल तर आम्हाला या क्षेत्रात आत्मनिर्भर होणे आवश्यक असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. स्वदेशीच्या वापरावर जोर देताना सरसंघचालक म्हणाले की, स्वदेशीचा वापर म्हणजे जगाला नाकारणे असे होत नाही. वेळोवेळी आम्हाला जगाशी व्यवहार करावाच लागतो. परंतु, आपल्या हाती पर्याय उपलब्ध असल्यास आम्ही आमच्या अटीवर जगाशी व्यवहार करू शकतो. त्यासाठी अर्थव्यवस्था आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. मात्र, तुर्तास आमची परिस्थीती तशी नाही. जागतिक अर्थव्यवस्थांपुढे भांडवलशाही आणि साम्यवाद असे दोनच पर्याय आहेत. परंतु, आमच्याकडे तिसरा पर्याय उपलब्ध आहे. भारताचा आर्थिक विचार हा हजारो वर्षांच्या अनुभवांवर तावून-सुलाखून प्रस्थापित आहे. त्यामुळे भारतीय आर्थिक विचारात त्रुटी किंवा कमतरता दिसून येत नाही. वर्तमानातील बदलांसोबत संतुलन साधताना आम्हाला भारताच्या प्राचिन आर्थिक विकासाची कास धरणे आवश्यक आहे. व्यक्ती ते समाज सर्व घटकांची सर्वांगिण प्रगती साधल्या गेली तरच त्याला समृद्धी म्हणता येईल. नियमातील बदल, परस्पर सहकार्य, कालसापेक्ष बदलांच्या स्वीकारातून आम्ही आर्थिकदृष्या समर्थ होऊ शकतो. असे झाले तरच आम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला स्वतंत्र म्हणवून घेण्यास पात्र असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले.