कोरोनाच्या सावटात राखी पौर्णिमा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोनाच्या सावटात राखी पौर्णिमा

आज राखी पौर्णिमा कोरोनाच्या सावटात पुन्हा होत आहे. गेल्या वर्षी तर प्रचंड बंदोबस्तात राखी पौर्णिमा साजरी झाली होती. तेव्हा भीती होती आणि दहशतही होती. आणि घरोघर कुणी तरी रूग्ण होते किंवा कुणाचा तरी रोगाने मृत्यु झाला होता. त्यामुळे विचित्र प्रकारची भयकंपित करणारी भावना होती. आता कोरोनाचे सावट दूर झाले नसले तरीही तितकीशी भीती राहिली नाहि. जसे संकट सतत आले की त्याचे कुणालाच काही वाटेनासे होते, तसे आता कोरोनाच्या बाबतीत लोकांचे झाले आहे. लोकांना आता कोरोनाच्या विषाणुबाबत फारसे काही महत्व उरले नाहि. कोरोनाबाबत जगायची लोकांनी सवय लावून घेतली आहे. त्यामुळे यंदा कोरोनाच्या सावटात जरी राखीपौर्णिमा होत असली तरीही तितकीशी बंधनेही यंदा नाहित. कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचे पाहून सरकारनेही आपल्याकडून थोडा हात ढिला सोडला आहे. केवळ राज्यकर्ते लोकांना घाबरवण्यासाठी मधूनमधून कडक लॉकडाऊन लावण्याच्या धमक्या देत असतात. वास्तविक भाऊ आणि बहिण यांच्यातील आगळ्यावेगळ्या नात्याचा रक्षाबंधन हा सण कित्येक म्हणजे शेकडो वर्षांपासून साजरा होत आला आहे. भाऊ आणि बहिण यांच्यातील प्रेमाचे महत्व सांगणारा हा सण असल्याने घराघरात भाऊ बहिण या सणाची वाट पहात असतात. भावाला आवडेल अशी राखी निवडण्यासाठी बहिणी दिवसभर बाजारात फिरून शेकडो राख्या पाहून एक चांगलीशी राखी निवडायच्या. हे यापूर्वीचे दृष्य नेहमी दिसणारे असे. कोरोनामुळे त्यांच्या शोधावरही मर्यादा आल्या आहेत. मुळात बाजारपेठेच्या वेळांवरही कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. कोरोनामुळे पूर्वी तर दुपारी दोन वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवायची परवानगी होती. आता ती सायंकाळी चार वाजेपर्यंत केली आहे. आता महाराष्ट्रासह काही राज्यांत दुकानाची वेळ रात्री १० वाजेपर्यंत केली आहे. मुंबईत तर ती १० वाजेपर्यंत आहे. पण त्याचे कारण वेगळे आहे. पुढील वर्षी महापालिका निवडणूक आहे आणि त्याआधी व्यापार्यांना नाराज करायला नको, म्हणून हा निर्णय घेतला आहे, हे उघड आहे. परंतु त्यानिमित्ताने लोकांचा फायदा होत आहे, ही त्यातल्या त्यात सकारात्मक गोष्ट आहे. दोन वर्षांनी प्रथमच पूर्वीसारख्या उत्साहाने सण साजरा करण्याची संधी भाऊ बहिणींना मिळत असली तरीही लोकांनीही संयम पाळून रक्षाबंधन साजरा केला पाहिजे. एकतर महामारीमुळे लॉकडाऊन अमलात आहे आणि दुकाने कमी वेळ उघडी आहेत. त्यातूनही बहिणींना लाडक्या भावांसाठी राख्या आणि त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ यांची निवड करावी लागणार आहे. राखी पौर्णिमा हा भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव आहे हे मान्य केले तरीही त्याची परिणती कोरोनाच्या साथीत होऊ नये, याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. यापुढे राखीपौर्णिमाच नव्हे तर प्रत्येकच सण अशी काळजी घेऊन सर्व धर्मियांनी साजरा करण्याची गरज आहे. येथे कुणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रश्नच नाहि. भावांनाही बहिणींसाठी भेट वस्तु खरेदी करताना बाजारपेठेतील वेळा आणि कोरोनाचे सावट यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. कोरोना पश्चात हेच न्यू नॉर्मल आहे आणि याची सवय प्रत्येकाने आता करून घ्यायला हवी. सण म्हटले की लोकांचा उत्साह उतू जात असतो. त्यात काही गैर नाहि. परंतु प्रत्येकाने आपण कोरोनाच्या सावटात सण साजरा करत आहोत, याचे भान ठेवून घरातही अति गर्दी टाळली पाहिजे. गर्दीतून कोरोनाचा विषाणु पसरत असल्याने लोकांनी सावधानता बाळगूनच सण साजरा करणे आवश्यक आहे. हा उपदेश नाहि तर लोकांनी न्यू नॉर्मलमध्ये सण कसा साजरा करावा, याचे विवेचन आहे. कारण आता कोरोनाची लाट आली तर मात्र ती अनियंत्रित होणार असून त्यामुळे अनर्थ घडणार आहे. कारण आता कोरोना विषाणुचा प्रसार अत्यंत झपाट्याने करणारा डेल्टा प्लस विषाणु चांगलाच सक्रिय झाला आहे. कोरोनाचा प्रसार व्हायला कोणतेही निमित्त जीवघेणे ठरणार असल्याने आणि डेल्टा प्लस हा विषाणु कोणत्याही लसीला जुमानणारा नसल्याने सर्वांनीच याचे गांभिर्य समजून घ्यायला हवे. तसेही आपल्याकडेही लिखित साक्षरता भरपूर असली तरीही वैचारिक साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शिक्षित लोकही सर्रास रोगजंतूंचा प्रसार होईल, असे वागत असतात. काही जणांना कोरोना वगैरे आहे, हेच मान्य नाहि. कोरोनाच्या भयानक सावटाखाली रक्षाबंधन होत असल्याने सर्वांनीच संयम पाळून तो साजरा केला पाहिजे.याचे कारण असे आहे की भारताची आरोग्य यंत्रणा अत्यंत अपुरी आहे. आरोग्य यंत्रणेचे वाभाडे पहिल्या दोन लाटांमध्येच निघाले आहेत. राखीपौर्णिमेच्या गर्दीतून कोरोनाचा विषाणु पसरला तर तो आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे न पुरेशी औषधे आहेत न पुरेसा प्राणवायु आहे. शिवाय रूग्णालयांत बेडही उपलब्ध आहेत की नाहित, याची कुणीच खात्री देऊ शकणार नाहि. भारताच्या आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेऊन सर्वांनी सण साजरा करावा. राखी पौर्णिमेसारखे सण हे लोकांना एकत्र आणणारे आणि लोकांमध्ये सामाजिक भावना वाढीस लावणारे असतात. परंतु कोरोनाच्या सावटात अनेक भाऊ बहिण हे वेगवेगळ्या शहरांत रहात असतील तर त्यांना एकत्र येणे शक्य नाहि. त्यांना आभासी पद्धतीनेच सणात सहभागी व्हावे लागेल. हेच न्यू नॉर्मल आहे.