सीरमला 7 ते 11वयोगटांतील मुलांवर प्रयोग करण्यास परवानगी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सीरमला 7 ते 11वयोगटांतील मुलांवर प्रयोग करण्यास परवानगी

नवी दिल्ली : कोरोनावरील नवीन लसीचा 7 ते 11 वयोगटांतील मुलांवर प्रयोग करण्यास सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भारतीय औषध नियामक मंडळाने (डीसीजीआय) परवानगी दिली. या आधी 12 वर्षांवरील मुलांवर चाचणी करण्यास परवानगी दिली होती.

आतापर्यंत १८ वर्षांवरील लोकांना लसीकरण केले जात आहे. आता पुढील टप्प्यात लहान मुलांना देखील लसीकरण केले जाणार आहे. यासाठीची तयारी सुरू झाली आहे. देशात अनेक राज्यांमधील शाळा हळूहळू सुरू होऊ लागल्या आहेत. लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसीवर काम करत आहेत. सीरम इन्स्टिट्यूटला 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी अमेरिकेची कंपनी नोवावॅक्सच्या लसीवर संशोधन करत आहे. कंपनीने भारतात या लसीचे नाव कोवावॅक्स ठेवले आहे.

कंपनीने ही ट्रायल देशभरातील 100 मुलांवर केली आहे. मात्र या लसीच्या आपत्कालीन वापराला देशात अद्याप तरी मंजूरी मिळालेली नाही. देशात केवळ झायडस कॅडिलाच्या लसीलाच 12 वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळालेली आहे.

दरम्यान कोविड 19 विरूद्ध नोव्हावॅक्स लसीच्या परिणामकारकतेची आकडेवारी आशादायक आहे. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही.के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते की, सार्वजनिकपणे उपलब्ध आकडेवारीवरून असं लक्षात येतं की, नोव्हावॅक्स ही लस सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहे. उपलब्ध आकडेवारीवरून आपण जे पाहात आहोत ते म्हणजे ही लस खूपच सुरक्षित आणि प्रभावी आहे. परंतु ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट तयार करेल, हे त्याहून प्रभावी आहे. सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मितीची कामे यापूर्वीच पूर्ण केली आहेत आणि प्रणाली पूर्णत: कार्यान्वित करण्यासाठी चाचण्या घेत आहे, जे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असेही पॉल यांनी सांगितले होते.