“राजकारणी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा मारतात”; ‘सिरम’च्या सायरस पूनावालांचे रोकठोक मत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“राजकारणी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा मारतात”; ‘सिरम’च्या सायरस पूनावालांचे रोकठोक मत

भारतामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वात आधी परवानगी मिळालेल्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता फेटाळली आहे. डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत, असा टोला पूनावाला यांनी लगावला आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. तसेच सध्या चर्चेत असणाऱ्या लसींचं कॉकटेल करणं चुकीचं असल्याचं मतही पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे.

“लसींचे कॉकटेल करणे चुकीचे. १८ वर्षांखालील मुलांना कोविशिल्ड देणार नाही. ते धोकादायक आहे,” असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच लसीकरणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता पूनावाला यांनी, “राजकारणी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा मारतात,” असं रोकठोक उत्तर दिलं. वर्षाअखेरीसपर्यंत लसीकरण होईल आणि सप्टेंबर पर्यंत ४५ कोटी लस मिळतील असे सांगितले जात आहे. त्यावर पूनावाला म्हणाले की, “राजकारणी लोक हेच थापा मारतात, आम्ही महिन्याला १० कोटी लसींचं उत्पादन घेतलं आहे. हे काही सोपे काम नाही. यामध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही महिन्याला १० कोटी प्रमाणे वर्षाला ११० ते १२० कोटी होईल. तसेच इतर कंपन्यांच्या आकडेवारीवरून देखील स्पष्ट होईल की किती लस उपलब्ध होईल.” मृत्यूदर कमी असल्याने लॉकडाउन लावला जाऊ नये असंही पूनावाला म्हणाले. १५० देश लसीची वाट पाहात असून मोदी सरकारने लसींच्या निर्यातीला परवनगी द्यायला हवी, अशी मागणीही पूनावाला यांनी केली आहे.

करोना परिस्थिती हाताळण्यात आपण अपयशी ठरलो आहे का?, त्यावरही पूनावाला यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “सर्वांना अपेक्षा की आम्हाला लस पाहिजे. पण हे काही सोपे नाही. आमच्याकडे आम्ही २० लसी तयार करायचो ज्या १५ कोटीपर्यंत होत्या. पण आता आम्ही करोना लसीचे उत्पादन १५ कोटींवर घेऊन गेलो आहे. त्यामुळे इतर लसीचे काही प्रमाणात उत्पादन कमी केले आहे, आम्हाला देशाची काळजी आहे.”