‘सारथी’साठीची १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी – संभाजीराजे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘सारथी’साठीची १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी – संभाजीराजे

मुंबई : राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरून बराच वादंग सुरू झाल्याचे दिसून आले आहे. आता छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’संदर्भात लक्ष केंद्रीत करावे, असे म्हणत १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी अशी मागणी केली आहे. तसेच, १४ जुलै रोजी सारथी बोर्डाची महत्वाची बैठक होणार असून, या बैठकीनंतर पुढी रुपरेशा ठरणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना संभीजीराजे म्हणाले, आमची १९ जून रोजी बैठक झाल्यानंतर बोर्ड मिटींग ताबडतोब होणे अपेक्षित होतं, मात्र आता ती १४ जुलै रोजी ही ठरलेली आहे. बोर्ड मिटींगमध्ये १९ जूनचे जे मुद्दे ठरलेले होते, ते परत एकदा अभ्यासले जातील. त्यावर चर्चा केली जाईल आणि पुढील दिशा ठरणार आहे.

तसेच, मात्र एकच आजही खंत आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरात लवकर त्यावर लक्ष केंद्रीत करावं, ती म्हणजे आम्ही १ हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मलाही कल्पना आहे की हजार कोटी एक वर्षात खर्च करणं, इतकं सोपं नाही. तुम्ही फेज १,२,३ असं करू शकता. सारथीच्या बाबतीत एक महिना आता जवळपास होत आलेला आहे. सरकारने त्यावर लक्ष केंद्रीत करावं. जो निधी यांना लागणार आहे सारथीला खर्चासाठी, तो अद्याप अर्थ विभागाकडून आलेले दिसत नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी जी काही मागणी केली असेल, माझ्या अंदाजाप्रमाणे ८०० ते ९०० कोटींची त्यांनी मागणी केली आहे. तरी, लवकरात लवकर उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थ विभागाने यामध्ये लक्ष घालून हा निधी लवकरात लवकर जाहीर करावा. जेणेकरून त्यांनी जे ठरवलेलं आहे की, वर्षभरात काय कामं करायची ती मार्गी लागतील. यामुळेच १४ जुलै रोजी होणाऱ्या बोर्ड मिटींग नंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.

आम्ही एक महिन्याची मूदत दिली होती, ती संपत आलेली आहे. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती आहे की अगोदर तुम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत, पण त्या ऑनपेपर यायच्या आहेत. बोर्ड मिटींगच झालेली नाही. पण तोपर्यंत तुम्ही आमची हजार कोटींची मागणी फेज १,२,३ च्या माध्यमातून जाहीर करावी.