तालिबानच्या कचाट्यात जग

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तालिबानच्या कचाट्यात जग

अफगाणिस्तानात तालिबानच्या रूपाने पुन्हा एकदा मध्ययुगीन राजवट आली आहे. अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने देश ताब्यात घेतला आहे. तब्बल वीस वर्षांनंतर तालिबानी राजवट पुन्हा झहिर राजाच्या या एकेकाळच्या पाश्चात्य आणि आधुनिक देशात परतली आहे. ज्या अफगाण महिला सत्तरीच्या दशकात जीन्स टी शर्ट घालून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पाश्चात्य देशात जात असत, त्या अफगाण महिलांची पुढची पिढी आता घरात बंदिस्त होईल. तालिबान अफगाणिस्तानात सत्तेवर आल्याने सर्व जगालाच पुन्हा दहशतवादाचा धोका निर्माण झाला आहे. काही मूर्खांना तालिबानची राजवट आल्याने आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. पण ते तालिबानच्या राजवटीत नसल्याने त्यांना आपली मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. तालिबानची राजवट सर्वात अशुभ जर कुणाला असेल तर ती अफगाण महिलांना. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन म्हणाल्या त्याप्रमाणे अफगाण महिला या फक्त तालिबानी गुलाम पैदा करण्याच्या यंत्र म्हणून रहातील. त्यांना कसलेही स्वातंत्र्य नसेल, शिवाय घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्यही नसेल. यापूर्वीही त्यांनी ही राजवट आणि त्यातील वाट्याला येणारी अपरिहार्य दुःखे भोगली आहेत. पुन्हा त्यांना त्याच यमयातनांतून जाव लागणार आहे. हे एक मानवी संकट आहे आणि सर्वात जास्त ते महिलांवर कोसळले आहे. तालिबानचा जगाला जो धोका आहे तो वेगळा आहे. तालिबानकडे प्रचंड शस्त्रास्त्रे आहेत आणि त्यापेक्षाही लढाऊ वृत्ती जास्त आहे. त्यामुळे ते केवळ अमेरिका, चिन आणि रशिया तसेच भारत सोडला तर कोणत्याही राष्ट्राला भारी ठरू शकतात. अफगाण सैन्याने आणि अध्यक्ष अशरफ गनी यांनी तालिबानशी जराही लढत दिली नाहि. गनी तर एक हेलिकॉप्टर आणि चार कारमध्ये मावेल इतका पैसा घेऊन पळून गेले. आपल्या जनतेला तालिबानसारख्या क्रूर राजवटीच्या हातात सोडून पळून जाणार्या गनी यांना खरेतर अगोदर शिक्षा द्यायला हवी. तालिबानपेक्षाही ते जास्त दोषी आहेत. तालिबानी राजवटीची दहशत इतकी आहे की, लोक काबूल विमानतळावर अक्षरशः एस टी बससारखी गर्दी करून चेंगराचेंगरी करून देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रयत्न करताना एकाला तालिबानी सैनिकाने सरळ गोळ्या घातल्या. तालिबानी राजवट येण्यास कारण जसे गनी यांची पळपुटेपणाची वृत्ती आहे, तसेच अमेरिकेचा मानवाधिकारांबद्दल असलेला ढोंगीपणाही आहे. ज्यावेळी गरज आहे तेव्हाच अमेरिकेने काबूलमधून आपले सैन्य माघारी बोलवले आहे. ज्यो बिडेन यांनी त्या निर्णयाचे समर्थनही केले आहे. लाखो अफगाण महिलांना क्रूरकर्मा तालिबान्यांच्या हातात सोडून जाणार्या अमेरिकेला आता महासत्ता आणि मानवाधिकारांचे रक्षणकर्ते म्हणवून घेण्याचा हक्क नाहि. जेव्हा गरज आहे तेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानातून पळ काढला आहे. हीच अमेरिका कश्मिरमध्ये भारतीय सैन्याकडून कश्मिरी जनतेवर कथित अत्याचार होत असल्याबद्दल ठराव करते. अमेरिकेला आता मानवाधिकारांबद्दल बोलण्याचाही अधिकार उरलेला नाहि. सारे मानवाधिकार तालिबानी राजवटीच्या पायाखाली आता तुडवले जाणार आहेत. भारतासाठी तालिबानी राजवट येणे ही चांगली गोष्ट नाहि. कारण चिन आणि पाकिस्तानने तालिबानला मान्यता देण्याचे ठरवले आहे. याचा अर्थ, भारताची कोंडी करण्याचा त्यांचा डाव आहे. तालिबानी गट आता कश्मिरात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांना मदत करू शकतात. पाकिस्तान तालिबानी गटांचा वापर भारताविरोधात करू शकतो. अर्थात पाकिस्तानला आता आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरीही पाकिस्तानही सुरक्षित नाहि. तालिबानी गट पाकिस्तानलाही धोका करू शकतात. कारण तालिबानविरोधात पाकिस्तानने अमेरिकेला मदत केली होती. ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा अमेरिकन सैन्याला पाकिस्तानी राजवटीनेच दिला होता. त्यामुळे तालिबान पाकिस्तानलाही धडा शिकवेल. शिवाय तालिबान पाकिस्तानला इस्लामी राजवट मानत नाहि. अर्थात भारताला इतकी भीती बाळगण्याचे कारण नाहि. कारण भारत तालिबानपेक्षा कितीतरी लष्करीदृष्ट्या सुसज्ज आहे. परंतु कश्मिर सीमेवर भारताची डोकेदुखी वाढणार आहे, हे मात्र निश्चित आहे. भारताने अफगाणिस्तानात राहिले पाहिजे. कारण भारताचे बरेचसे हितसंबंध अफगाणिस्तानात आहेत. तेथील संसदेची इमारत भारतानेच बांधली आहे. आता ती नसल्यात जमा आहे इतकी उध्वस्त झाली आहे. भारताने तालिबानच्या राजवटीला मान्यता देऊन आपले नुकसान टाळावे, हेच योग्य राहिल. भारताबरोबर अमेरिकेनेही अफगाणिस्तानात हात पोळून घेतला आहेत,. भारताने तालिबानींशी गुप्त चर्चा केली आहे. तालिबानी क्रूर आहेत, हे कुणालाही मान्य करावे लागेल. अफगाण नागरिकांची दयनीय अवस्था पाहून कुणालाही दया यावी. अक्षरशः चालत्या विमानात चढण्याचा प्रयत्न अफगाण नागरिकांनी केला आणि त्यातून कितीतरी पडून मरण पावले. तालिबानच्या राजवटीत रहाण्याचा कुणाचीही इच्छा नाहि. पण त्यांचे राज्यकर्तेच पळून गेल्यावर नागरिकांनी कुणाकडे पहायचें, अशी स्थिती आहे. सारे जगच तालिबानच्या कचाट्यात सापडले आहे. याचे कारण तालिबानी आता पाकिस्तानातील जैश ए महंमद, पॅलेस्टाईनची हमास वगैरेसारख्या दहशतवादी गटांशी संधान जुळवतील आणि त्यांना मदत करतील. तालिबानच्या हातात तेथील अफुची लागवड आहे. त्यातून अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था उभी रहाते. तालिबान्यांच्या यशामुळे सार्या दशहतवादी गटांना संदेश गेला आहे. ते आणखी प्रखर हल्ले करतील. ते टाळायचे असेल तर गुप्तचर यंत्रणांना अत्यंत दक्ष रहावे लागेल. लष्करी तयारी जोरदार करावी लागेल. सातत्याने आपल्या सीमांवर लक्ष ठेवावे लागेल. भारतासह सार्या देशांना हे करावे लागेल. चिन आणि पाकिस्तानने पाठिंबा दिल्याने आणखी काही वर्षे तरी तालिबानी राजवट रहाणार हे निश्चित आहे. त्यामुळे भारताने तालिबानला पाठिंबा देऊन आपले दगडाखाली अडकलेले हात काढून घ्यावे, हा मुत्सद्दीपणाचे राहिल.