काँग्रेसच्या चारित्र्यावरील काळा डाग

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काँग्रेसच्या चारित्र्यावरील काळा डाग

काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने आणिबाणी लादल्याचा आज दुःखद स्मृतिदिन आहे. बरोबर पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी इंदिरा सरकारने आणिबाणी जाहिर केली आणि रातोरात विरोधी नेत्यांना विनाचौकशी अटक करून तुरूंगात डांबले. ज्या कायद्याखाली त्यांना अटक करण्यात आली त्यात विनाचौकशी कितीही दिवस तुरूंगात सडवण्याची तरतूद होती. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा कमालीचा संकोच करण्यात आला आणि त्यांनी काय छापायचे ते सरकारी अधिकारी ठरवू लागले. वाहिन्या तर त्यावेळी नव्हत्याच. आणिबाणीमुळे सारे विरोधी पक्ष एक झाले आणि संतप्त जनतेच्या मदतीने इंदिरा सरकारला हरवले. पुढे जनता सरकारही नेत्यांमधील क्षुद्र मतभेद आणि अहंकारापायी टिकले नाहि आणि पुन्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. परंतु मधला अडीच वर्षाचा काळ हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय म्हटला पाहिजे.  या काळात काय झाले, कसे अत्याचार झाले आणि कशी वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी झाली, याची जंत्री देण्याची काहीच गरज नाहि कारण आता ते सर्व बाहेर आले आहे.  परंतु यानंतर काँग्रेस एक धडा शिकली. काँग्रेसने नंतर कधीही आपल्या सत्ताकालात आणिबाणी लादण्याचा विचारही केला नाहि. काँग्रेसचे पूर्वीचे रेकॉर्ड खरेतर डागाळलेले नव्हते. पंडित नेहरूंना कितीही नावे ठेवली तरीही ते अव्वल दर्जाचे लोकशाहीप्रेमी होते, हे मात्र मान्य करायलाच हवे. विरोधी पक्षांचा टिका करण्याचा अधिकार ते मान्य करत. मात्र ही लोकशाहीची कदर करण्याची वृत्ती ते आपल्या कन्येत रूजवू शकले नाहित. इंदिरा गांधी यांनी आणिबाणी आणण्याचे वास्तविक काही कारण नव्हते. त्यांची खासदारपदावरील निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने अवैध ठरवली होती. त्या पुन्हा पोटनिव़डणुकीत निवडून येऊ शकल्या असत्या. बांगलादेश युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवल्यामुळे त्या कमालीच्या लोकप्रियही होत्या. परंतु तोपर्यंतही त्यांना दुसर्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे हाती देणे अवघड का वाटले, हे रहस्य आहे. वास्तविक त्यावेळी त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ आणि लायक नेते होते. परंतु इंदिरा गांधी यांनी थेट आणिबाणीच लादली, ज्याची कुणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. कारण इंदिरा गांधी या लोकशाहीमूल्ये मानणार्या पंडित नेहरूंच्या कन्या होत्या. विरोधी पक्षही सुरूवातीला अवाक झाले. परंतु अखेर त्यांनी परिस्थिती समजून घेतली आणि मग देशाने कधी न पाहिलेला असा लढा सुरू झाला. आज पंतप्रधान मोदी यांच्यावर अघोषित आणिबाणी लादल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करत असतात. काही अंशी ते खरेही आहे. कारण विरोधी विचार व्यक्त केले तर आज त्याला देशद्रोही ठरवले जाते. तरीही आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या पोलिसांनी जे अनन्वित अत्याचार केले, त्यांची तुलना कशाशीही होऊ शकत नाहि. माजी संरक्षणमंत्रि दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांचे बंधु ऑस्कर यांना तर तुरूंगातील मारहाणीतून कायमचे अपंगत्व आले. मात्र आणिबाणीविरोधात लढण्याची जनतेने आणि विरोधी पक्षांनी जी जिद्द दाखवली, त्यालाही इतिहासात तोड नाहि. पूर्वीच्या काँग्रेसमध्ये अनेक त्यागी आणि चारित्र्यवान नेते होते आणि त्यांनाही इंदिराजींचा हा निर्णय नापसंत होता. मात्र ते बोलून दाखवण्याचे धैर्य कुणातच नव्हते. काँग्रेसने त्यानंतर आणिबाणी लागू करण्याचा विचारही कधी मनात आणला नाहि, हे खरे असले तरीही गांधी कुटुंबातील कुणीही त्यानंतर त्या निर्णयाबद्दल देशाची माफीही मागितली नाहि. आणिबाणीच्या त्या निर्णयाचे समर्थन करणारेही आहेत. जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा सरकारविरोधात जोरदार आंदोलन चालवले होते. त्यांनी पोलिसांना सरकारचे आदेश पाळू नका, असा आदेश दिल्यानंतर इंदिराजींना नाईलाजाने आणिबाणीचा निर्णय घ्यावा लागला, असेही समर्थन काहीजण करतात. पण त्यात काही अर्थ नाहि. इंदिराजींना आणिबाणी लादण्याचा सल्ला दिला तो सिद्धार्थ शंकर रे यांनी. त्यांचे राजकीय अस्तित्वच नंतर राहिले नाहि. आज आणिबाणी आणि त्यामुळे पणाला लागलेली लोकशाही मूल्ये हे सारेच कालबाह्य झाले आहे. आजच्या पिढीला आणिबाणीच्या काळात नेमके काय झाले, याबद्दल काहीही माहिती नाहि  आणि ते जाणून घेतले तरीही तिला त्यात काही विशेष वाटणार नाहि. कारण आणिबाणीमध्ये ज्या मूल्यांसाठी लढा देण्यात आला, ती मूल्येच आज राहिली नाहित. सरकारी दमनयंत्रणा आज सगळीकडे आहे आणि ती सगळीकडे हाहाःकार उडवत आहे. काँग्रेस असो की अन्य कोणताही पक्ष, त्यांनी दमनयंत्रणा प्रभावीपणे राबवली आहे. प्रत्यक्ष आणिबाणी न लादताही तशीच हुकूमत गाजवता येते, याचा शोध लागल्यानंतर सत्तेतील सर्वच पक्षांनी सामदाम दंडभेद वापरून विरोधकांना खलास करण्याचा प्रयत्न केला आहे. आणिबाणीच्या नावाने आज गळे काढण्याची काहीच गरज नाहि. कारण तो काळ मंतरलेला होता. ती एक वेगळीच तत्वांची लढाई होती. आज राजकारण हे तत्वहीन आणि मूल्यहीन झाले  असल्याने आजचा लढा हा वेगळाच आहे. आज लोकशाही किंवा हुकूमशाही हा मुद्दाच नाहि. आज लोकांना किमान सुखाने जगता यावे, यासाठी सरकार काय सुविधा देते, याभोवतीच राजकारण फिरते आहे. पैशाच्या जोरावर सत्ता आणि सत्तेतून पैसा हे तत्व जिथे प्राथमिक तत्व झाले आहे, त्या काळात आणिबाणीविरोधातील लढ्याला काहीच अर्थ उरलेला नाहि. सदोदित लोकशाहीच्या गप्पा मारणार्या काँग्रेसच्या चारित्र्यावरील हा काळा डाग मात्र कधीच धुतला जाणार नाहि.