कष्टकऱ्याना लोकल प्रवासाची परवानगी द्या

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कष्टकऱ्याना लोकल प्रवासाची परवानगी द्या

मुंबई : पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वेमार्गावरून सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नाही. खासगी कर्मचारी, भाजी विक्रेते, कामगार वर्गाची गैरसोय होत असूून परिस्थिती गंभीर होत आहे. सामान्यांना सरसकट प्रवासाची परवानगी देऊ नका, परंतु काही कष्टकरी वर्गाला ठरावीक वेळेत प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सध्या ज्या नोकरदार वर्गाला लोकल प्रवासाची बंदी आहे व ज्यांच्याकडे स्वत:ची वाहने नाहीत तसेच सार्वजनिक वाहतुकीचीही सोय नसल्याने कर्जत, कसारा येथून मुंबईकडे येणाऱ्यांना पूर्णत: लोकलवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे काही जण लोकलमधून विनातिकीट किंवा बनावट ओळखपत्र तयार करून लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. घरकाम करणाऱ्या महिला व खासगी क्षेत्रातील महिलावर्ग यांना आवश्यकतेनुसार प्रवास वेळ ठरवून द्यावी. तसेच खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आस्थापनेच्या अधिकृत विनंतीपत्राद्वारे लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. राज्याचे अर्थचक्र  सुरळीत ठेवण्यासाठी कारखाने, औद्योगिक वसाहती सुरू ठेवल्या. मात्र यामधील कामगारांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाही. ही बाब चुकीची असून त्यांनाही लोकल प्रवासाला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आल्याचे रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सांगितले.