मला दबाबतंत्र वापरायचं नाही; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मला दबाबतंत्र वापरायचं नाही; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारले

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश करण्यात न आल्यानं पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं आहे. मुंडे भगिनी समर्थकांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे भाजपासह सगळ्याचंच लक्ष लागलं होतं. पंकजा मुंडे यांनी दिल्लीवरून मुंबईत परतताच भेटीसाठी दाखल झालेल्या समर्थकाशी संवाद साधला. “माझा आतापर्यंतचा प्रवास खडतर होता, पुढेही खडतरच दिसतोय; पण अविचाराने निर्णय घ्यायचे नसतात, असं सांगत पंकजा यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत असल्याचंही स्पष्ट केलं. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेकांनी पदाचे राजीनामे दिले असून, अनेक समर्थक मुंबईत दाखल झाले होते. दिल्लीहून परतलेल्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत आल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजा म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडे यांनी मला आमदारकीसाठी राजकारणात आणलं नाही. तर ज्या लोकांना त्यांना उभं केलं त्यांच्यासाठी मला त्यांनी राजकारणात आणलं. त्यांनी मोठ्या उद्देशाने आणलेलं नाही. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी मी राजकारणात आणलेलं नाही. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे लोक माझं कुटुंब आहेत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “माझ्या वडिलांचा अंत्यविधी तुम्हाला आठवत असेल. त्यावेळचा असंतोष तुम्हाला आठवतं असेल. लोकांच्या मनात गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल प्रेम आहे. मी संघर्ष यात्रा काढली. मी त्यावेळी केलेलं भाषण तुम्ही ऐकलेलं असेल. त्यावेळी मी म्हणाले होते की, माझं भांडण नियतीशी आहे. मी मुंडे यांची वारस आहे आणि मला पद हवंय असं मी कधी म्हणाले का कधी? मंत्रीपद हे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार नाही. जेव्हा माझं अस्तित्व पणाला लागलं होतं. माझ्याकडे शून्य ताकद होती. पायाखालची जमीन सरकलेली असताना मंत्रीपद नाकारणारी पंकजा मुंडे तुम्हाला राजीनामा द्यायला लावेल का? मला दबावतंत्र वापरायचं नाही, असं सांगत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे नाकारत असल्याची घोषणा केली.