शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अदर पूनावाला यांची मोठी घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अदर पूनावाला यांची मोठी घोषणा

करोना काळामध्ये देखील अनेक देशांमध्ये निर्बंध अजूनही कायम आहेत. पण काही देशांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध उठवले आहेत. अशा देशांमध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता संबंधित देशात जाण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना परदेशात गेल्यावर क्वारंटाईन केलं जात आहे. सिरम इन्स्टिट्युटतर्फे उत्पादित केली जाणारी कोविशिल्ड लस घेऊनही काही विद्यार्थ्यांना संबंधित देशामध्ये क्वारंटाईन व्हावं लागत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी मदतीचा हात पुढे केला असून तब्बल १० कोटींची रक्कम या विद्यार्थ्यांसाठी बाजूला ठेवल्याचं अदर पूनावाला यांनी जाहीर केलं आहे.

अदर पूनावाला यांचं ट्वीट

सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केलं आहे. त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत केली जाणार आहे, त्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. “परदेशी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनोकाही देशांमध्ये अजूनही कोविशिल्ड लसीला परवानगी मिळालेली नाही. क्वारंटाईन होता त्या देशात प्रवेश करण्यासाठी कोविशिल्ड लसीला संबंधित देशाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे अशा देशांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचा खर्च येतो. याचसाठी मी १० कोटींचा निधी बाजूला काढून ठेवला आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे”, असं अदर पूनावाला या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

विद्यार्थ्यांना येणाऱ्या खर्चाविषयी चिंता

दरम्यान, अदर पूनावाला यांनी या खर्चाविषयी चिंता व्यक्त केली आहे. “मी उच्च शिक्षणासाठी यूकेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईनमध्ये मदत करण्यासाठी कटीबद्ध आहे. नव्या अंबर यादीतील नियमांप्रमाणे भारतीय विद्यार्थ्यांना यूकेमध्ये त्यांच्या निवडीच्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्यांना यासाठी खर्च येऊ शकतो. मी त्यासाठी माझा वैयक्तिक १० कोटींचा निधी देऊ केला आहे”, असं अदर पूनावालांनी सांगितलं आहे. UnlockEducation या उपक्रमांतर्गत अदर पूनावालांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.