देशमुखांसाठी महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला धमकावले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देशमुखांसाठी महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला धमकावले

मुंबई, : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातील कागदपत्र मागण्यासाठी गेलेल्या अधिका-याला एसीपी दर्जाच्या अधिका-याने धमकावले. त्यामुळे सीबीआयने हायकोर्टात तक्रार केली आहे. अनिल देशमुख प्रकरणात तपासासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याचे राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी सीबीआयने याचिकेत केली आहे.सीबीआयने दाखल केलेल्या अर्जावरुन मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.

राज्य सरकार तपासामध्ये सहकार्य करत नसून कागदपत्र मागण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला एसीपी दर्जाच्या अधिका-यानं धमकावले अशी माहिती सीबीआयचे वकील अनिल सिंह यांनी न्या. एस.एस.शिंदे आणि न्या.एन.जे.जामदार यांच्या खंडपीठाला दिली. कोर्टाने राज्य सरकारला नोटीस जारी करत सरकारी वकील अरुणा कामत पै यांना सीबीआय अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी उत्तर देण्यास सांगितले. आम्ही सरकारला नोटीस बजावत आहोत. एसीपी सीबीआय अधिकाऱ्याला धमकावत आहेत. नेमकी स्थिती काय आहे, ते शोधून काढा असे खंडपीठाने म्हटले आहे. राज्याच्या गृहविभागातील अतिरिक्त मुख्य सचिवांनाही यात प्रतिवादी करण्याचे सीबीआयला हायकोर्टाकडून निर्देश आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.