क्रिकेटचे मैदान ते राजकारणाची खेळपट्टी : मनोज तिवारी झाला क्रीडामंत्री

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

क्रिकेटचे मैदान ते राजकारणाची खेळपट्टी : मनोज तिवारी झाला क्रीडामंत्री

क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या खेळपट्टीवर प्रवेश केलेला माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीला पश्चिम बंगालमध्ये क्रीडामंत्री होण्याचा बहुमान मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यात तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीचेही नाव आहे. ममता बॅनर्जी सरकारमध्ये मनोज तिवारीला क्रीडा व युवक राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी क्रिकेटपटू मनोज तिवारी आपल्या पत्नीसमवेत टीएमसीमध्ये दाखल झाला. लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण भाजप करीत असल्याचा आरोप त्याने केला. टीएमसीने त्यांना हावडाच्या शिबपूर विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले. जिथे त्याने नेत्रदीपक विजय नोंदविला.

छोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्द

मनोज तिवारीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ राहिली नाही. पण २००६-०७मध्ये रणजी करंडकातील त्याची कामगिरी कोणालाही विसरता येणार नाही. या करंडकात मनोज तिवारीने ९९.५०च्या सरासरीने ७९६ धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली. सामन्याआधी तो दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याला २००८मध्ये भारतीय संघात संधी मिळाली. 

स्थानिक स्पर्धेत मनोज तिवारीने आपल्या खेळाने लोकांना वेड लावले. पण त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी राहिली नाही. संघात स्थान मिळविण्यासाठी त्याला बराच काळ थांबावे लागले. त्याने एकूण १२ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मनोज तिवारीच्या नावावर वनडेमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक आहे. २०१५मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.