हाफिज सईदच्या पाकिस्तानामधील घराबाहेर बॉम्बस्फोट, दोघांचा मृत्यू, १४ जखमी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

हाफिज सईदच्या पाकिस्तानामधील घराबाहेर बॉम्बस्फोट, दोघांचा मृत्यू, १४ जखमी

लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोबयाचा म्होरक्या हाफिज सईद रहात असलेल्या पाकिस्तानाच्या जोहार टाऊन परिसरातील घराबाहेर बॉम्बस्फोट झाला आहे. बुधवारी झालेल्या या स्फोटात दोघांचा मृत्यू, तर सुमारे १४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे लाहोर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने हाफिज सईदच्या घराबाहेर मोटरसायकल लावली होती आणि त्यातूनच धमाका झाला. दरम्यान पोलिसांनी याचा तपास सुरू केला असून या भागाची नाकाबंदी करण्यात आली आहे. 

 

प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले की, या स्फोटाचा धमाका जबरदस्त होता. यामध्ये एक इमारत कोसळली असून आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. स्फोट झालेल्या ठिकाणच्या गाड्यांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.  एहसान मुमताज रुग्णालयाच्या जवळ असलेल्या ई ब्लॉकमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. घटनेत जखमी झालेल्या सर्वांना जिना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सुरू असून, मदत कार्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती लाहोरचे सीसीपीओ गुलाम महेमूद डोगर यांनी दिली आहे.

दरम्यान लाहोरचे पोलीस उपायुक्त मुदसीर रियाज मलिक यांनी सांगितले की, या घटनेत महिला आणि लहान मुलांसह १२ जण जखमी झाले आहेत. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. घटनेचा तपास केल्यानंतर बॉम्बस्फोटाच्या कारणाविषयी सांगू शकू.