काँग्रेसमध्ये गंभीर पेच

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काँग्रेसमध्ये गंभीर पेच

काँग्रेसच्या पंजाब प्रांतातील गटात निर्माण झालेला पेच कमी होण्याची चिन्हे तर नाहितच, पण उलट त्याची क्लिष्टता वाढतच चालली आहे. खूप गाजावाजा करून माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी मुख्यमंत्रि अमरिंदर सिंग यांच्यात सलोखा झाल्याचे जाहिर करण्यात आले होते. त्याचे श्रेयही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना देऊन झाले. पण मनाने दोघेही नेते एकत्र आलेच नाहित आणि अमरिंदर यांना कॉँग्रेसने पद सोडण्यासही सांगितले. पुढील वर्षी लवकरच होणार्या निवडणुकीत पहिला दलित मुख्यमंत्रि दिल्याचे कार्ड खेळण्यासाठी अगदीच करिष्मा नसलेल्या चरणजीतसिंह चन्नी यांना मुख्यमंत्रि करण्यात आले. पण सिद्धू यांचा राग शांत होण्याची चिन्हे दिसत नव्हती. अखेर त्यांनी प्रांताध्यक्षपदाचा राजिनामाच देऊन टाकला. त्यामुळे आता काँग्रेसला प्रांताध्यक्ष नाहि. सिद्धू यांना नेमके काय हवे आहे, तेच गुलदस्त्यात आहे. शिवाय सिद्धू यांना मनमोकळेपणे काम करता यावे म्हणून त्यांचे कट्टर शत्रु अमरिंदर सिंग यांनाही मुख्यमंत्रिपदावरून काढण्यात आले. तरीही सिद्धू यांनी नाराज होऊन पद सोडले.आता त्यांच्या नव्या नाराजीचे कारण चन्नी यांनी केलेल्या नियुक्त्या असे सांगितले जात आहे. तर तिकडे अमरिंदर यांनी आपण काँग्रेस सोडणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. अर्थात आपण काँग्रेस सोडणार असलो तरीही भाजपमध्ये जाणार नाहि, असेही सांगायला ते विसरलेले नाहित. या सर्व घडामोडींवरून पंजाबमध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत अवघड होऊन बसली आहे, एवढे मात्र निश्चित आहे. हे तर पंजाबचे झाले. पण राष्ट्रीय पातळीवरही कपिल सिब्बल यांनी पुन्हा राष्ट्रीय नेतृत्वाला आव्हान दिले आहे. त्यामुळेही काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे कार्यकर्त्यांनी सिब्बल यांच्या घरासमोर निदर्शने वगैरे केली. काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी थेट ही नियोजित गुंडगिरी असल्याचा आरोप करून काँग्रेसमध्ये किती भयंकर अस्वस्थता आहे, हेच दाखवून दिले आहे. जी २३ गटाच्या नेत्यांना पक्षसंघटनेत सुधारणा हवी आहे. तर खुद्द राहुल गांधी हे काहीच बोलत नाहित. त्यामुळे त्यांना नक्की काय करायचे आहे, हेच समजत नाहि. हे संभ्रमाचे वातावरण कायम ठेवण्यात काँग्रेसमधील काही हितसंबंधी मंडळींना स्वतःचे हित दिसत असल्याने कुणीच यावर काहीही स्पष्ट करत नाहि. सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष असल्याने काँग्रेसमध्ये वरपासून ते खालपर्यंत निर्नायकी अवस्था आहे. गुजरातेत भाजपने निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्रि बदलला, म्हणून टिका करणार्या काँग्रेसला दोन दिवसात पंजाबमध्ये मोठ्या राजकीय पेचाला सामोरे जावे लागले आणि त्यांना आपलाही मुख्यमंत्रि बदलावा लागला. अमरिंदर यांच्यासारखा इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेला नेता आज पक्ष सोडून जात आहे. तरीही काँग्रेसमध्ये कसलीही हालचाल नाहि, काहीही चर्चा नाहि. अशी अवस्था काँग्रेसमध्ये केंद्रिय सत्ता नसल्याने झाली आहे. कारण सतत सत्तेत रहाण्याची सवय असलेला हा पक्ष सात वर्षांपासून केंद्रिय सत्ता नसल्याने सैरभैर झाला आहे. नेतृत्वाला काँग्रेसला सत्तेत आणण्याची क्षमता अवगत नसल्याने आता खालचे नेतेही वरिष्ठ नेत्यांना जुमानत नाहित. माजी केंद्रिय मंत्रि आणि ज्येष्ठ नेते नटवरसिंह यांनीही राष्ट्रीय नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. यावरून काँग्रेसला आपले घर अगोदर नीट करण्याची किती गरज आहे, हेच सिद्ध होत आहे. पंजाब हे तर एक उदाहरण आहे. पण राजस्थानमध्ये काँग्रेस बंडखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अमरिंदर यांनी भाजपमध्ये जाणार नाहि, असे सांगितले असले तरीही ते कधीही तिकडे जाऊ शकतात. ते केंद्रिय गृहमंत्रि अमित शहा यांची भेट घेऊन आले आहेत. त्यामुळे ही शंका बळावली आहे. पण ते कुठेही गेले नाहित तरीही ते काँग्रेसच्या मार्गात पंजाबात काटे पेरणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अमरिंदर यांचे काय होते, यावर कुणाची नसली तरीही राजस्थानातील युवा नेते सचिन पायलट यांची नजर असेल. तेही उद्या भाजपमध्ये जाऊ शकतात. त्यांचे बंड थांबवताना पक्षश्रेष्ठींच्या नाकी नऊ आले आहेत. आणि काँग्रेसचे केंद्रिय नेतृत्व अत्यंत खिळखिळे झाले असल्याने चित्र असे आहे की, स्थानिक नेते हे वरिष्ठांना जुमानतच नाहित. मुख्यमंत्रि अशोक गेहलोत हे सोनियांच्या मर्जीने सर्वोच्च पदावर आले असले तरीही ते सोनियांनाही जुमानत नाहित, असे दिसते आहे. छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्रि भूपेश बघेल आणि आरोग्यमंत्रि सिंगदेव यांच्यात आडवा विस्तव जात नाहि. अडीच अडीच वर्षे दोघांनाही मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले होते, असे सिंगदेव सांगत आहेत. त्यावरून त्यांच्यात संघर्ष उफाळला आहे. काँग्रेसला खूप सुधारणा कराव्या लागतील. तरच त्यांना लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये चांगली तयारी करून उतरता येईल. सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. केंद्रात सत्ता नसल्याने नेते इकडून तिकडे पळत आहेत आणि त्यांना थांबवण्यासाठी कोणतेही आमिष दाखवण्यासाठी काँग्रेसकडे केंद्रात सत्ताच नाहि. सत्ता नसताना किती वाईट अवस्था होते आणि लहानसहान कार्यकर्तेही जुमानत नाहित, याचा अनुभव काँग्रेस घेत आहे. अर्थात केवळ सत्ताकांक्षी पक्ष असल्याने ही अवस्था आहे. विचारधारा पक्की असेल तर असे घडत नाहि. आणि हा पेच निकाली काढण्यात केंद्रिय नेतृत्व सक्षम नाहि, असे दिसत आहे.