भाजप आणि शिवसेना दोघांचेही नुकसान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भाजप आणि शिवसेना दोघांचेही नुकसान

केंद्रिय मंत्रि नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जे आक्षेपार्ह उद्गार काढले, त्यानंतर राज्यात जे दोन दिवस नाट्य घडले, ते महाराष्ट्राला तर शोभा देणारे नव्हतेच, पण भाजप आणि शिवसेना या दोन्ही शत्रु बनलेल्या मित्रांचे नुकसान करणारे ठरले. राणे यांचे मुख्यमंत्र्यांबद्दलचे उद्गार हे कोणत्याही दृष्टिने समर्थनीय होऊ शकत नाहित. पण शिवसेनेने एकदम जोशात येऊन राणेंविरोधात जी रस्त्यावर येऊन पोलिसांना शिवीगाळ केली, पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे शिवसेनेचीही प्रतिमा चांगलीच मलिन झाली. वास्तविक शिवसेनेची रस्त्यावर येऊन आंदोलने करण्याचीच परंपरा आहे आणि इतकी वर्षे शिवसेना तेच करत आली आहे. त्यावरूनच तिने जनमानसात स्थान मिळवले आहे. बायाबापड्यांना आजही शिवसैनिक कोणत्याही संकटाच्या क्षणी धावून येतील, असा मनोमन विश्वास वाटतो. इतर पक्षांबद्दल असा विश्वास मुळातच वाटत नाहि, हे खरे आहे. अर्थात अलिकडच्या शिवसेनेच्या वर्तनामुळे तो विश्वास आता डळमळीत झाल्यासारखा वाटत आहे. परंतु मुख्यमंत्रि ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे मुख्यमंत्रिपदावर आल्यापासून शिवसेनेची प्रतिमा सुधरवण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. रस्त्यावरच्या मारामार्यांपासून शिवसेना काही वर्षे दूर आहे. शिवसेनेची प्रतिमा इतर राजकीय पक्षांसारखी हायटेक आणि विचारांनी लढणारी अशी करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न मनापासून होता. परंतु राणे प्रकरणात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवस जो काही आंदोलनाच्या नावाखाली धुडगूस घातला, त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा पुन्हा एकदा हाणामारी करणारा पक्ष अशीच दृढमूल झाली आहे. मुख्यमंत्रि ठाकरे यांच्या मनोरथाला यामुळे चांगलाच झटका बसला आहे. अशी प्रतिमा घेऊन आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थान मिळवू शकत नाहित, हे प्रथम त्यांच्याच लक्षात आले. मुळातच त्यांच्यावर शिवसेनेला आवश्यक असलेला आक्रमक स्वभाव नाहि, असेही आरोप होत आले आहेत. पण ते स्वभावतःच सौम्य आणि सोज्वळ आहेत. भारतीय जनमानसात रस्त्यावर मारामार्या करणार्या पक्षांबद्दल चांगले मत कधीच नसते. त्यामुळे त्या पक्षाला त्याचे फटकेही बसत असतात. शिवसेनेची सुधारलेली प्रतिमा दोन दिवसात ढासळली आहे. याचा फायदा शिवसेनेला तरूण मतदारांच्या पाठिंब्याच्या रूपाने होऊ शकतो. तरूण मतदारांची अशा आंदोलनकारी पक्षांना पसंती असते. परंतु प्रौढ आणि विचारी मतदार शिवसेनेकडे फिरकणारही नाहित. जेव्हा राणे यांची केंद्रात मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली, तेव्हाच शिवसेनेला कोणत्याही प्रकारे त्रास देण्यासाठी त्यांना घेतले आहे, हे शिवसेनेने समजून त्यांच्या कोणत्याही सापळ्यात अडकायचे नाहि, असे ठरवायला हवे होते. परंतु शिवसेना नेहमीप्रमाणे भाजपने लावलेल्या सापळ्यात अडकली आणि आता ठाकरे विरूद्ध राणे हा वाद चांगलाच चिघळणार आहे. मुबंई पालिका निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसणार आहे. सर्वात संयमी प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची होती. त्यांनी जो तो आपल्या संस्कृतीनुसार बोलतो, असे सांगून या विषयावर बोलण्याचे टाळले. शिवसेना नेते पवारांना सरकारचे मार्गदर्शक म्हणतात. कोणत्याही परिस्थितीत आपली मनःशांती ढळू द्यायची नाहि आणि आक्षेपार्ह वक्तव्य करायची नाहित, हा राजकीय शहाणपणा शिवसेना पवारांपासून का शिकत नाहि, हे एक कोडेच आहे. राणेंच्या माध्यमातून भाजपने शिवसेनेला डिवचले आणि त्यातून भाजपला फायदा होणारच आहे. दोन दिवसात प्रथमच भाजप कार्यकर्ते शिवसेना किंवा युवा सेना कार्यकर्त्यांना थेट भिडले. राणे परिवार अगोदर शिवसेनेतच असल्याने शिवसेना जशी वागते तसेच ते राणेंचे कार्यकर्ते वागले. शिवसेनेला अशी सवय नाहि. पहिल्यांदाच शिवसेना कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर मिळाले. यात भाजपच्या संयमी आणि शांत प्रतिमेच्या चिंधड्या उडाल्या. भाजप आणि शिवसेनेत काहीही गुणात्मक फरक नाहि, असे आता मतदारांना वाटू लागले असेल, तर भाजपसाठी ते हानिकारक आहे. मुंबईत भाजपला याचा फायदा होईल, पण देश पातळीवर भाजपची प्रतिमा मलिन होणे, हे राष्ट्रीय पक्षाला परवडणारे नाहि. शिवसेनेने राणेंविरोधात अनेक एफआयआर दाखल करून सत्तेचा गैरवापर केला, हे तर सारेच मानतात. राणे यांची जन आशिर्वाद यात्रा सुरू होण्याअगोदरच सूडभावनेने राज्य सरकारने राणेंच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू केले होते. हाच न्याय काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना नेत्यांनाही लागू होतो, कारण त्यांनीही असे मेळावे घेतले होते. पोलिसांची तर यात सर्वात मोठी चूक आहेच. पण भाजपने केंद्रिय स्तरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाच आहे. भाजपच्या कृतींनाही आता आव्हान दिले जाऊ शकते. माजी मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कृतीची तालिबानशी तुलना केली. पण भाजपच्या केंद्रातील सरकारने अनेकांचा आवाज दाबला आहेच. त्यांची तुलना कशाशी करणार, हाही प्रश्न आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राणेंना अटक करण्याची कारवाई म्हणजे घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवल्यासारखे आहे, असे म्हटले. परंतु भाजपच्या केंद्र सरकारने सरकारविरोधात बोलल्याबद्दल यापेक्षाही कठोर कारवाई केली आहे. याचा अर्थ एकच आहे की, राजकीय नेत्यांना हल्ली टिका सहन होईनाशी झाली आहे. त्यासाठी ते लगेच सत्तेचा दुरूपयोग करतात. मग ती शिवसेना असो, भाजप असो की अन्य एखादा पक्ष. या एकूणच प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे बिघडले आहे, हे जाणवते. राजकीय सहिष्णुता हल्ली लोप पावली आहे. याचे फटके एकूणच समाजाला बसत आहेत. पंडित नेहरू कितीही टिका झाली तर ती संसदेत ऐकून घेत असत. त्यांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास होता. भाजप आणि शिवसेना यांनी आपण आता राज्यकर्ते आहोत, याचे भान सतत ठेवले पाहिजे. विरोधकांच्या मानसिकतेतून दोघानीही बाहेर येण्याची आवश्यकता आहे. अन्यथा या पक्षांसह सार्या राज्यात कमालीचे वैर आणि द्वेषभावाचे वातावरण राहिल.