बॅडमिंटन रॅकेटचा मास्टर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बॅडमिंटन रॅकेटचा मास्टर

जेव्हा भारतात क्रिकेटशिवाय बॅडमिंटनचा खेळ फक्त कथा कादंबर्या  आणि चित्रपटांमध्येच वाचूर आणि पाहून माहित होता. मराठी कथेतील नायक आणि तरूण जोडपी सायंकाळी बॅडमिंटनची रॅकेट घेऊन खेळायला जाताना लेखक दाखवत. चित्रपटात नायक नेहमीच बॅडमिंटनचा चॅम्पियन असे. तेव्हा प्रत्यक्षात त्याला बॅडमिंटनची रॅकेट कशी धरायची, हेही माहित नसे. त्या काळात नंदू नाटेकर यांनी १९५६ मध्ये प्रथम या खेळात आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले होते. नाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण शंभर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावली. त्या नाटेकर यांचे रात्रि उशिरा पुण्यात  निधन झाले. बॅडमिंटन क्षेत्रावर यामुळे शोककळा पसरली आहे. भारतात क्रिकेटशिवाय अन्य खेळ पन्नासच्या दशकातही लोकप्रिय नव्हते. कथाकादंबर्यांमध्ये बॅडमिंटनची फक्त वर्णनेही नसत, तर केवळ नायकाला रॅकेट हातात घेऊन खेळलेले कादंबरीकार दाखवत. परंतु त्यामुळे हा खेळ काहीसा लोकप्रिय झाला होता. सामान्य लोकही म्हणजे तरूण लोक हळूहळू या खेळाकडे वळू लागले होते. पण बॅडमिंटन असो की टेनिस, हे खेळ लोकप्रिय न होण्याचे एकमेव कारण म्हणजे  त्यांची रॅकेट खूप महाग असे. सर्वसामान्य माणसाला ती परवडणारी नसे. क्रिकेटला जसे साधे बेशरम बाड नावाचे दांडकेही स्टंप म्हणून चालते. तसे या राजेशाही खेळांना चालत नाहि. त्यामुळे मोजकीच उत्तम परिस्थिती असलेली मंडळी या खेळाकडे वळत. टेनिस किंवा बॅडमिंटन या खेळाडूंकडे वरच्या पातळीवरचा म्हणून पाहिले जाते. तरीही हा खेळ सामान्यापर्यंत आणण्यात नंदू नाटेकर यांचा बराच वरचा क्रम लागतो. परंतु त्यांनी तत्कालिन श्रीमंतांच्या पोरांसारखे केवळ हौस म्हणून रॅकेट कधीच हातात धरली नाहि. त्यांनी आंतरराष्ट्रीय विजेतेपदांपर्यंत मजल मारली. नाटेकर यांनी प्रथम क्रिकेट आणि नंतर टेनिसकडे आपला मोर्चा वळवला होता. पण नंतर त्यानी बॅडमिंटन या खेळाला आपला सोबती बनवले. मग पन्नास ते सत्तरच्या दशकात त्यांनी या जागतिक मंचावर या खेळावर राज्य केले. इतकी वर्षे त्यांचाच बोलबाला होता. १९५६ मध्ये मलेशियातील सेलांगर आंतराराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय होते. जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या नाटेकर यांनी प्रतिष्ठेच्या अशा ऑल इंग्लंड चॅम्पियन स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते. ते साल होते १९५४. बॅडमिंटन पुरूष दुहेरी आणि एकेरी स्पर्धा त्यांनी प्रत्येकी सहा वेळा जिंकली होती. थॉमस कप स्पर्धेत त्यांनी १९५५ ते १९६३ या काळात जोरदार प्रदर्शन करत तब्बल १२ एकेरी आणि १६ दुहेरी सामने जिंकले होते. पण त्यांच्या सामन्यांतील विजयाची जंत्री देण्याचे येथे काहीच कारण नाहि. नाटेकर इतके अफाट यश का मिळवू शकले, याची कारणमिमांसा करायची आहे. कारण त्यातूनच त्यांची महानता सिद्ध होणार आहे. अर्जुन पुरस्काराचे ते पहिले मानकरी होते. आज बॅडमिंटनमध्ये तुफान वेगवान सर्व्हिस आणि वेगाला अतिशय महत्व प्राप्त झाले असताना अत्यंत नजाकतीने सर्व्हिस करणारे नाटेकर यांचे निधन व्हावे, हा दुर्दैवी योगायोग आहे. केवळ वेगाला महत्व देण्याला महत्व आले असले तरीही नाटेकर यांच्यासारखे काही खेळाडू असे होते की नजाकतीला त्यांच्या दृष्टिने महत्व असे.  नाटेकर यांच्याकडे वेग नव्हता परंतु केवळ नजाकतीने ते प्रतिपक्षाकडे फूल असे काही मारत असत की त्याच्याक़डे उत्तरच नसे. त्यांचा खेळ प्रतिपक्षाच्या फेकीचा अंदाज आणि फसवा मारा यावरच अवलंबून असे. १९५० आणि ६० च्या दशकात नाटेकर यांचा बॅकहँड अत्यंत जोरकस होता. त्याच्या जोरावर ते आपल्या डोक्यावर येणारी सर्व्हिस शिताफीने प्रतिपक्षाकडे टोलवत असत. नाटेकरांचा खेळ इतका नजाकतीचा असे की लोकांचं लोंढे त्यांचा सामना पहाण्यासाठी गर्दी करत असत. नाटेकर यांचे सर्व्हिसवर प्रचंड नियंत्रण असे आणि त्यांचे अंदाज अचूक असत. शटलवर त्यांचे कमालीचे नियंत्रण असे. नाटेकर यांना एका गोष्टीचे श्रेय द्यावेच लागेल. त्यांच्यामुळे बॅडमिंटन हा खेळ कथा कादंबर्यांच्या प्रांगणातून प्रत्यक्षात मैदानावर आला. इनडोअरमध्ये आला. अनेक तरूणांना त्यांच्यामुळे स्फूर्ती मिळाली. प्रकाश पडुकोन यांच्याकडे त्यांच्या खेळाचा काही प्रमाणात वारसा आला होता. नाटेकर यांनी खेळाडूंना केवळ जोर आणि वेग नव्हे तर कौशल्याने खेळायचे कसे, हे आपल्या यशाने शिकवले. परंतु नाटेकर यांच्यासारखा जबरदस्त तरीही नजाकतभरा खेळ करणारा बॅडमिंटनपटू नंतर झाला नाहि, हे भारताचे दुर्दैव म्हणावे लागेल. सायना नेहवालनेच नाटेकर यांच्यानंतर त्यांच्यापेक्षाही जास्त यश मिळवले. पण या खेळाचे ते भारतातील प्रणेते होते, असेच म्हणावे लागेल. नाटेकर हे त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय खेळाडू होते. तेव्हा सुनील गावसकर आणि सचिन तेंडूलकर यांचा काळ येण्याला खूप अवकाश होता. परंतु नाटेकर यांचे तरूण उमदे व्यक्तिमत्व आणि त्यांचा खेळ यामुळे अनेक तरूणी आणि तरूणही त्यांचे चाहते होते. त्या काळातील त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज कुणालाच येणे शक्य नाहि.  परंतु ज्येष्ठांच्या तोंडून त्यांच्या लोकप्रियतेच्या कहाण्या ऐकल्या आहेत. जिवंतपणी दंतकथा झालेले व्यक्तिमत्व आजकाल कुणाच्याही बाबतीत बोलले जाते. पण नाटेकर हे खरेखुरे लिव्हिंग लिजंड होते. नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.