लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग बंदची हाक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग बंदची हाक

सिंधुदुर्ग, : उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग बंदची हाक पुकारण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सोमवार दि. ११ ऑकटोबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा.पर्यंत सिंधुदुर्ग बंद पाळावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच उत्तर प्रदेश लखीमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून त्यांचे प्राण घेण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, संजय पडते , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, व्हिक्टर डान्टस, काका कुडाळकर, प्रवीण भोसले या महाविकास आघाडीतील सिंधुदुर्ग मधील नेत्यांची बैठक वेंगुर्ले येथे संपन्न झाली. या बैठकीत सोमवार दि. ११ ऑकटोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा.पर्यंत सिंधुदुर्ग बंद पाळण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील व्यापारी नागरिक यांनी शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सिंधुदुर्ग बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले आहे.