अखेर दहावी परिक्षा रद्द

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अखेर दहावी परिक्षा रद्द

महाविकास आघाडी सरकारने अखेर दहावी परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ अधिकृत घोषणा केली जात नाहि. परंतु परिक्षा आता होणार नाहि, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विद्यार्थ्यांच्या नववी परिक्षेतील ग्रेडवर आता निकाल दिला जाईल. हे चांगले की वाईट, हे ज्याने त्याने ठरवावे. कारण ज्या पालकांना दहावीत शिकणारी मुले आहेत, त्यांना या निर्णयाने हायसे वाटेल. मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्यासमोर सर्वात जास्त असेल. त्यामुळे प्रत्येकाची भूमिका आपापल्या सोयीनुसार असणार, हे उघ़ड आहे. मुलांना कोरोना काळात परिक्षा द्यायला लावणे हे अन्यायकारक आहे, असे पालकांना आणि खुद्द मुलांनाही वाटू शकेल. तसा विचार करत असतील तर त्यांच्या दृष्टिने ते बरोबरच आहेत. परंतु या निर्णयामुळे हुषार मुलांवर मात्र अन्याय झाला आहे. नववीला मुले जास्त अभ्यास करत नाहित. नववीपासून एकदम दहावीचाच अभ्यास सुरू करतात. कारण त्यांना दहावीची परिक्षा होणार नाहि, असे काही स्वप्न पडलेले नसते. त्यांचे मात्र या निर्णयामुळे नुकसान होणार आहे. दहावीला आपण जोरदार अभ्यास करून मेरिटमध्ये येऊ,  अशा आशेने ज्या मुलांनी नववीला जुजबी अभ्यास करून थेट दहावीचाच अभ्यास केला असेल, त्यांना आता कमी गुणांना सामोरे जावे लागेल. हा तर  एक मुद्दा झाला. असे अनेक आहेत. काही मुले नववीला आजारी वगैरे पडतात. काहींना दहावीला आता जोरदार अभ्यास करून चांगले गुण मिळवू, असे वाटत असेल, त्यांनाही चांगलाच फटका बसणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने परिक्षा न घेणे हा मुद्दा वरकरणी बरोबर वाटतो. परंतु बारकाईने पाहिल्यास त्यातील खाचाखोचा लक्षात येतील. परिक्षा स्थगित ठेवून वातावरण निवळले की नंतर परिक्षा घेता आली असती. कोरोनाच्या भीतीने मुले काही संबंध दिवसभर घरात बसलेली नसतात. ती फिरतच असतात. धोका तर तेव्हाही असतोच. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे सीबीएसई दहावी परिक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. संपूर्ण दहावीच यंदा मुलांना शिक्षण खात्याकडून दिल्या गेलेल्या गुणांवर उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.  मुलांना परिक्षेचा अनुभव येणारच नाहि. कारण  राज्य सरकारच्या एका दिव्य निर्णयानुसार तसेही आठवीपर्यंत मुलांना परिक्षाच नाहि. आता नववीच्या मार्कांवर दहावीचा निकाल. सारेच गौड बंगाल आहे. पालकांना आज जरी हा निर्णय चांगला वाटत असेल तरीही त्यांच्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिने त्यांना यातील धोके लक्षात येत नाहित. अर्थात त्याला त्यांचाही नाईलाज आहे. मुलांना कोणत्याच परिक्षेचा अनुभव नसल्याने प्रथम ती बारावीची परिक्षा देतील तेव्हा त्यांची काय अवस्था होईल, हे कुणीच सांगू शकत नाहि. दहावी परिक्षा फार तर यंदा न घेता पुढील वर्षी घेता आली असती. त्याऐवजी परिक्षाच रद्द करणे हा निर्णय अनाकलनीय आहे. पालकांच्या दबावाखाली हा निर्णय झाला असण्याची शक्यता आहे. पण यात आपल्याच मुलांचे आपण नुकसान करत आहोत, हे कुणीच लक्षात घेत नाहि. वाटल्यास यंदा कोरोनाची महामारी आहे. तर परिक्षाच घेतल्या जाऊ नयेत. परंतु मुलांना नववीच्या गुणांवर पासही केले जाऊ नये. नाहितरी अकरावी आणि बारावीचे प्रवेश तरी कुठे पक्के झाले आहेत. आणि पालक दहावी परिक्षेला पाठवण्यास नाखुष असतील तर अकरावीला महाविद्यालयात पाठवण्यास कसे तयार होतील, याचाही विचार व्हायला हवा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने हा निर्णय आहे. परंतु मुले दहावी उत्तीर्ण होऊन तरी काय करतील, हाही प्रश्न आहेच. दहावीनंतरच्या पुढच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश तरी कशाच्या आधारावर देणार, हे सरकारला ठरवावे लागेल. दहावी परिक्षा ही मुलांच्या आयुष्यातील पहिली महत्वाची परिक्षा असते. ज्यामधून त्यांचे स्वयं मूल्यांकन केले जाते. आपण किती पाण्यात आहोत, हे मुलांना त्याच परिक्षेतून प्रथमच कळते. बोर्डाची परिक्षा या शब्दांच्या मागे जी भीती असते, तिचा वर्षभर सामना केल्यानंतर मुलांना यशस्वी झाले तर जे आत्मिक समाधान लाभते,त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार नाहि. या परिक्षेत चांगले यश मिळवले तर मुलांना जो आत्मविश्वास मिळतो, तो पुढे त्यांना कोणत्याही परिक्षेसाठी पुरेसा ठरतो. परंतु यंदा मुले या सर्वापासून वंचित रहाणार आहेत. दहावी परिक्षा रद्द केल्यानंतर पालक आणि मुलांची प्रतिक्रिया संमिश्र आहे. ज्या मुलांनी झटझटून अभ्यास केला आहे, त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार, हे स्पष्ट आहे. त्यांचे समुपदेशन करावेच लागणार आहे. काहीही असले तरीही आता दहावी परिक्षा होणार नाहित, हे स्पष्ट आहे. मुलांना आता अकरावीच्या दृष्टिने नियोजन करण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्या कामाला आता त्यांनी लागावे. परिक्षा म्हणजेच सारे काही नाहि, हे  तर आहेच. परंतु यशासारखे यश नाहि, हे ही खरे आहे.