मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडेच राहणार; यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही”

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुख्यमंत्रीपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडेच राहणार; यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही”

शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे. असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे आणि मला असं वाटतं की, शरद पवार यांनी देखील परवा जाहीरपणे हेच वक्तव्यं केलंल आहे.” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. नाशिकमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “ आमच्या कुणाचाही मनात संभ्रम नाही. पण प्रसिद्धी माध्यमांमुळे लोकांच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून आणि मी त्या प्रक्रियेतील एक घटक होतो, अनेक गोष्टी माझ्या समोर घडलेल्या आहेत, मी साक्षीदार होतो म्हणून मी आपल्याला सांगतो की या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण काळासाठीच राहील. त्यामध्ये कोणताही वाटा किंवा घाटा होणार नाही.”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानावर प्रतिक्रिया

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी काळात काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं म्हटलेलं आहे, तर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नाना पटोलेंचं नाव देखील चर्चेत आणलं आहे.. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “ या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, काँग्रेसमध्ये एका पेक्षा एक सरस लोकं आहेत. सगळ्याच राजकीय पक्षात असे दावेदार असतात, प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांना वाटतं पंतप्रधान व्हावं. काँग्रेसमध्ये देखील खूप प्रमुख लोकं आहेत की जे पंतप्रधान पदाच्या लायकीचे उमेदवार आहेत, नक्कीच आहेत आणि राजकारणात कोणतीही आकांक्षा आणि स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. मला वाटत नाही काँग्रेसची काही नाराजी आहे. तुम्ही त्याकडे नाराजी म्हणून का पाहाता? तीन भिन्न विचारांचे पक्ष आहेत, त्यातून एक महाविकासआघाडी निर्माण झालेली आहे. ज्याला आपण किमान समान कार्यक्रम म्हणतो, त्या आधारावर हे सरकार बनलेलं आहे. हे सरकार बनवताना तीन पक्ष एकमेकांमध्ये विलीन झालेले नाहीत. पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र आहे. प्रत्येकाची विचारधारा स्वतंत्र आहे. सरकार बनवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, प्रत्येकाला आपला पक्ष विस्तारण्याचा वाढवण्याचा आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.