सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाजादरम्यान मोबाईल वापराबाबत नियमावली

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाजादरम्यान मोबाईल वापराबाबत नियमावली

मुंबई : राज्य सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाज करताना मोबाईल फोनचा वापर करण्याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या ११ सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या आधी डिसेंबर महिन्यात कार्यालयात कोणते कपडे घालावे, यासाठी नियमावली जाहीर केली होती.

या नव्या नियमावलीर भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलतांना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी आदी नियमांचा समावेश आहे. राज्य सरकारतर्फे शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.५६/१८ (र.वा.) काढण्यात आले आहे.

काय आहेत नियम

१. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राधान्याने कार्यालयातील दूरध्वनीचा (Landline) वापर करावा.

२. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा.

३. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.

४. भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.

५. कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघु संदेशाचा (Text Message) शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा.

६. भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.

७. भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे आणि भाषेचे तारतम्य बाळगावे.

८. अत्यावश्यक, वैयक्तिक दूरध्वनी हे कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत.

९. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर ठेवावा.

१०. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे, इयर फोन वापरणे अशा बाबी टाळाव्यात.

११. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये.