राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी तयार करण्याची गरज – संजय राऊत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी तयार करण्याची गरज – संजय राऊत

“देशाला एका उत्तम अशा विरोधी पक्षांच्या आघाडीची गरज आहे. जशी महाराष्ट्रात महाविकासआघाडी काम करत आहे, अशाप्रकारे आघाडी आपण उभं करू शकतो का? यासंदर्भात कालच माझी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. लवकर यासंदर्भात हालचाली सुरू होतील.” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच, यावेळी त्यांनी अन्य मुद्यांवरील प्रश्नांना देखील उत्तर दिली आहेत.

संजय राऊत म्हणाले, “मी असं कुठं म्हणतोय की नवीन नेतृत्व? एकत्र बसून ठरवायला हवं. प्रत्येकाला वाटतं मीच नेता आहे पण तसं नाही आघाडी अशी निर्माण होत नाही. जसं महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंना प्रमुख केलं व सरकार उत्तम चाललं आहे. देशातली ही एक आदर्श आघाडी आहे. तीन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले व त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ही एक आदर्श अशी व्यवस्था आपण निर्माण केली. राष्ट्रीय स्तरावर देखील अशाप्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. अशाप्रकारचंच मत मी व्यक्त केलं आहे.”

महाराष्ट्र मॉडेलवर आता पंतप्रधान मोदी देखील बोलायला लागले आहेत
तसेच, “महाराष्ट्र मॉडेल हा संदर्भ मी वेळोवेळी देत आहे, याच महाराष्ट्र मॉडेलचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि त्याच महाराष्ट्र मॉडेलवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता बोलायला लागले आहेत. म्हणजे या लढाईत महाराष्ट्र पुढे आहे. महाराष्ट्राने स्वतःची लढाई स्वतःच्या बळावर लढली आहे. याचं श्रेय नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना द्यावं लागेल. सगळेजण काम करत आहेत. आता देखील मी आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यात तीन कोविड सेंटरची उद् घाटनं केली. ती सरकारी नाही ती शिवसेनेच्या माध्यमातून उभी केली आहेत. महाराष्ट्राची स्थिती का चांगली आहे? सरकारला समांतर अशी कोविड सेंटर व यंत्रणा राजकीय कार्यकर्ते देखील उभी करत आहेत. त्यामुळे सरकारचा भार कमी होतो आहे. हे इतर राज्यांमध्ये झालं नाही. आता अनेक संघटना, संस्था काम करतात, मी पक्षांची नावं घेत नाही. पण त्यांना हे शिवसेनेसारखं काम करता आलं नाही. त्यामुळे आज अनेक राज्यांमध्ये ज्या चिता पेटलेल्या दिसत आहेत, कब्रस्तानात जागा नाही हे चित्रं जे जगात गेलं आहे, त्याचं कारण तेच आहे.” असंही यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

 “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. अशाप्रकारची वक्तव्यं करण हे बहुधा विरोधी पक्षाच्या कार्याचा भाग असेल. परंतु फडणवीस यांच्या आरोपांना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलेलं आहे.” असं राऊत म्हणाले.