हेमंत सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

हेमंत सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपाने आसाममधील सत्तेत घरवापसी केली. आसाममध्ये भाजपा सत्ता स्थापन करत असल्याचं निकालाच्या दिवशीच स्पष्ट झालं होतं. मात्र, नवीन सरकार कुणाच्या नेतृत्वाखाली असेल, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना कायम करणार की, हेमंत बिस्वा शर्मा यांना संधी मिळणार? अखेर हे चित्र रविवारी स्पष्ट झालं. सोनावाल यांना बाजूला सारत हेमंत बिस्वा शर्मा यांनी बाजी मारली आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा पराभव करत निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, ही निवडणूक लढवत असताना भाजपाने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल कोणतीही वाच्यता केली नव्हती. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आसाम भाजपातील वजनदार नेते हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नावाभोवतीच चर्चा सुरू होती. काल (8 मे) दिल्लीत बैठक झाल्यानंतरही कोणतीही वाच्यता करण्यात आली नव्हती.

दरम्यान, रविवारी सकाळी सोनोवाल यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर भाजपा संसदीय कार्यकारिणीची बैठक गुवहाटी येथे पार पडली. या बैठकीत हेमंत बिस्वा शर्मा यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. या बैठकीला केंद्रीय कृषीमंत्री आणि भाजपाचे नेते नरेंद्रसिंह तौमर, आसामचे पक्ष निरीक्षक अरूण सिंह हे उपस्थित होते.