राजस्थान काँग्रेसमधील कलह संपणार?; मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राजस्थान काँग्रेसमधील कलह संपणार?; मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपुष्टात आल्यानंतर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपला मोर्चा राजस्थानकडे वळवला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर पडदा टाकण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न सुरु केले आहेत. पंजाबमध्ये नवजोत सिंह सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर राजस्थानमधील पायलट गटाच्या आशा वाढल्या आहेत. काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाळ आणि राजस्थान प्रभारी अजय माकन यांच्या उपस्थितीत २८ जुलैला एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जयपूरमध्ये होणाऱ्या बैठकीत आमदारांना उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. यासाठी के सी वेणुगोपाळ आणि अजय माकन यांनी काँग्रेस आमदारांशी चर्चा केली. दरम्यान राजस्थानमध्ये २८ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी के सी वेणुगोपाळ आणि अजय माकन यांनी चर्चा केली. ही चर्चा जवळपास अडीच तास चालली. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय सोनिया गांधींवर सोडल्याचं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितलं. त्यामुळे सोनिया गांधी लवकरच निर्णय घेतील असं बोललं जात आहे.

पायलट गटातील आमदार मुकेश भाकर आणि रामनिवास गावरिया यांनी राजस्थानमध्ये लवकरच न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. “काँग्रेस देशात बदल करत आहे. त्यामुळे आशा आहे की, इथेही न्याय मिळेल. राजस्थान गेल्या काही दिवसांपासून वाट बघत आहे. आता ते पूर्ण होईल असं दिसतंय. तसेच मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसश्रेष्ठींचं म्हणणं ऐकणार असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आशा आहे की, राजस्थानात सर्व काही ठिक होईल.”, असं मुकेश भाकर आणि रामनिवास गावरिया यांनी सांगितलं.