राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका

मुंबई :- राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अनाथांना वयाच्या 28 वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे.

राज्यातील 28 वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील 28 वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे शिधापत्रिका मिळेल त्याप्रमाणे त्याचे लाभ देण्यात येतील. या निर्णयामुळे राज्यातील अनाथ मुलांना मोठा आधार होणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. कोरोनाकाळात अनेक मुलांच्या पालकांचे मृत्यू झाल्यामुळे ते अनाथ झाले आहेत अशा मुलांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर शिधापत्रिका मिळवताना कागदपत्रांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे माहिती देखील मंत्री भुजबळ यांनी दिली. अनाथांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची भावना देखील मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली.