कोवॅक्सिन लसीची २-१८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोवॅक्सिन लसीची २-१८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने पावले उचलायला सुरवात केली आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच मुलांना करोना संसर्ग होण्याचे प्रमान देखील अधिक असेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसऱ्या / तिसर्‍या टप्प्यासाठी तपासणीची शिफारस केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दीली. ही चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जाईल.

भारत बायोटेकने मुलांमध्ये सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतर गोष्टींचं आकलन करण्यासाठी कोवॅक्सिन डोसच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या कोविड -१९ विषय तज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकने केलेल्या विनंती अर्जावर चर्चा केली. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग रुग्णालयीन व्यवस्था वाढविण्याबरोबर परिणामकारक उपचार देण्यासाठी डॉक्टरांच्या प्रशिक्षणावरही भर देत आहे. प्रामुख्याने या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात असतील, ही तज्ज्ञांची माहिती लक्षात घेऊन लहान मुलांवरील करोना उपचाराला प्राधान्य देण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्राणवायू लागू शकतो हे लक्षात घेऊन मिशन ऑक्सिजन स्वावलंबनयोजना युद्धपातळीवर राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.  तिसरी लाट ही लहान मुलांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे केंद्र सरकार व तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेऊन प्राणवायू खाटांची संख्या वाढवणे, लहान मुलांची वेगळी व्यवस्था करताना त्यांच्यावरील उपचाराला विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. लहान मुलांसोबत आई असणे आवश्यक असल्यामुळे खाटा व उपचाराची रचना करताना वेगळी व्यवस्था करावी लागेल.