मुंबईत ‘डेल्टा’चे १२८ रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत ‘डेल्टा’चे १२८ रुग्ण

मुंबई: कस्तुरबामध्ये कार्यरत झालेल्या पहिल्या जनुकीय  क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेसिंग) प्रयोगशाळेत १८८ नमुन्यांची चाचणी केली असून यात १२८ रुग्ण डेल्टाबाधित असल्याचे आढळले आहे. अल्फाचे दोन, कप्पा प्रकाराचे २४, तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण करोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

जिनोम सिक्वेसिंगची पहिली प्रयोगशाळा कस्तुरबामध्ये ऑगस्टपासून सुरू झाली असून यात दोन यंत्रे आहेत. एकाचवेळी ३८४ चाचण्या करण्याची क्षमता आहे. या यंत्रामध्ये पहिली चाचणी नुकतीच करण्यात आली. यात १८८ नमुन्यांची चाचणी केली गेली. चाचण्यांचे अहवाल पालिकेने जाहीर केले आहेत. १८८ पैकी १२८ रुग्ण हे डेल्टाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणाच्या जनुकीय चाचण्या?

जनुकीय चाचणी ही करोनाची सामान्य चाचणी नाही. सगळ्या रुग्णांची जनुकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही. खूप दिवस रुग्णालयात दाखल असेलेले, परदेशातून आलेले करोनाबाधित प्रवासी यांचे नमुने घेतले होते. त्याचबरोबर एखाद्या इमारतीत किंवा वसाहतीत एकाच वेळी अनेक रुग्ण आढळून आले तर अशा ठिकाणचे नमुनेही पाठवले होते, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

आधीच्या चाचण्यामध्ये मुंबईत डेल्टा प्लस बाधित ११ रुग्ण आढळले असले तरी त्यात एकही डेल्टा प्लसबाधित नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पालिकेचे आवाहन

डेल्टाचा प्रसार वेगाने होत असल्याचे लक्षात घेता करोना प्रतिबंधक निर्देशांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यांसारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.