जागतिक चर्चा विषयांना भारत नवीन आकार देईल – जयशंकर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जागतिक चर्चा विषयांना भारत नवीन आकार देईल – जयशंकर

न्यूयॉर्कआजच्या काळातील परिस्थितीचा विचार करून जागतिक पातळीवरील चर्चा विषयांना भारत एक नवी दिशा देऊ शकतो, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत टी.एस. तिरुमूर्ती संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

जयशंकर यांचे रविवारी सायंकाळी अमेरिका भेटीसाठी आगमन झाले. भारताला संयुक्त राष्ट्रसुरक्षा मंडळाचे अस्थायी सदस्यत्व मिळाले त्यानंतरची त्यांची ही पहिलीच अमेरिका भेट आहे. जयशंकर यांनी सोमवारी तिरुमूर्ती, के. नागराज नायडू इतर राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ट्वीट संदेशात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रातील भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी फलदायी चर्चा झाली आहे. तर तिरुमूर्ती यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर यांचे आम्ही आभारी आहोत.

न्यूयॉर्क येथून जयशंकर हे वॉशिंग्टनला जाणार असून तेथे ते त्यांचे समपदस्थ अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ब्लिंकन जयशंकर यांच्यात करोना साथ रोखण्याचे प्रयत्न, हिंद-प्रशांत सहकार्य, क्वाड गटाचे कार्य, संयुक्त राष्ट्रातील सहकार्य वृद्धिंगत करणे या विषयांवर चर्चा होणार आहे. करोना लशी, मदत यासह अनेक विषयांवर चर्चा त्यांच्या या भेटीत अपेक्षित आहे. त्यात प्रादेशिक सुरक्षितता आर्थिक अग्रक्रमांचा समावेश आहे. जयशंकर हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवान, बायडेन प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी, अमेरिकी काँग्रेसचे सदस्य, कंपनी क्षेत्रातील अधिकारी, भारतीय अमेरिकी समुदायाचे प्रतिनिधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत.