तालिबानचा लसीकरणाला विरोध

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तालिबानचा लसीकरणाला विरोध

अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर सोमवारी तालिबानने पूर्णपणे कब्जा केला. मात्र हे वृत्त केवळ अफगाणिस्तानला चिंतेत टाकणारं नसून करोनाविरुद्ध लढणाऱ्या जगतिक प्रयत्नांना मोठा धक्का समजलं जातंय. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानचं सरकार आल्याने करोनासोबतच पोलिओचं समूळ उच्चाटन करण्याचा उद्देश पूर्ण होण्याचा मार्ग आणखीन खडतर झालाय.

तालिबानने काबूलवर कब्जा केला तेव्हाचे फोटो जगभरामध्ये व्हायरल झाले. त्यानंतरही नागरिकांचा उडालेला गोंधळ आणि सर्व घटनाक्रम व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून समोर आला. या सर्व गोंधळामध्ये करोनासंदर्भातील नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारख्या गोष्टी अस्तित्वातच नसल्यासारखी परिस्थिती या फोटोंमधून वाटते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अफगाणिस्तानमधील करोना लसीकरणाची टक्केवारी अवघी ०.६ टक्के इतकी आहे. जगभरामध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्याची हीच टक्केवारी २३.६ टक्के इतकी आहे. तालिबानने मागील आठवड्यामध्ये पाक्तिका प्रांतामधील लसीकरण केंद्र बंद करुन लसीकरणाला विरोध केला होता.

मागील आठवड्यामध्येच अफगाणिस्तानला जागतिक करोनाविरोधी मोहिमेअंतर्गत १.४ मिलियन करोनाच्या लसी देण्यात आल्या होत्या. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या या लसी आहेत. ३ जानेवारी २०२० ते १६ ऑगस्ट २०२१ दरम्यान अफगाणिस्तानमध्ये करोनाचे १ लाख ५२ हजार १४२ रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण मरण पावणाऱ्यांची संख्या ७ हजार २५ इतकी आहे.

१० ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात १८ लाख ९ हजार ५१७ जणांना करोनाची लस देण्यात आलीय. जून महिन्यामध्ये करोनाची दुसरी लाट आली होती जेव्हा १७ जून रोजी सर्वाधिक म्हणजे २ हजार ३१३ रुग्ण आढळून आले होते. १६ ऑगस्ट रोजी येथे करोनाचे ९९ रुग्ण आढळून आलेत. तालिबानच्या करोना लसीकरणाविरोधी भूमिकेमुळे अफगाणिस्तानबरोबरच शेजारच्या देशांमध्येही करोनाचा फैलाव होण्याचा धोका व्यक्त केला जातोय.

जगभरातील ज्या देशांमध्ये अद्यापही पोलिओची समस्या मोठा प्रश्न म्हणून पाहिलं जातं त्यामध्ये अफगाणिस्तानचा समावेश आहे. २०१८ पासून येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला मोठा अडथळा निर्माण झालाय. ज्या भागांमध्ये तालिबानचे वर्चस्व आहे त्या ठिकाणी त्यांनी दारोदारी जाऊन लहान मुलांचं लसीकरण करण्यावर बंदी आणलीय.

करोना लॉकडाउनमुळे पोलिओ मोहिमेला मोठा फटका बसलाय. त्यातच आता संपूर्ण देशात तालिबानचं राज्य आल्याने पोलिओविरुद्धच्या मोहिमेमध्ये देश काही दशकं मागे जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. २०२० मध्ये य़ेथे ५६ बालकांना पोलिओची लागण झाल्याचं दिसून आलं होतं. ग्लोबल पोलिओ एज्युकेशन इनिशिएटीव्हच्या आकडेवारीनुसार हा पोलिओचा संसर्ग वाइल्ड म्हणून लोकसंख्येनुसार पसरणारा किंवा लसीकरणाच्या आभावामुळे पसरणारा आहे.