देशाच्या सीमा 2022 पर्यंत कुंपणाने बंद करणार- गृहमंत्री

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देशाच्या सीमा 2022 पर्यंत कुंपणाने बंद करणार- गृहमंत्री

नवी दिल्ली  : देशाच्या सीमेवर कुंपण टाकण्याचे काम सुरू आहे. आगामी 2022 पर्यंत सर्व सीमांवर कुंपणाचे काम पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी दिली. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 18 व्या शौर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी वीर पुरस्काराचे वितरण शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व जवानांना मी सलाम करतो. हे जवान सीमेवर सजग असून सुरक्षा करत असल्याने आपण सुखाने जगत असतो. त्यांच्यामुळेच आजही भारतात लोकशाही नांदत आहे आणि तिचा विकास होत आहे. त्यांच्या या बलिदानाला कधीही विसरु शकत नाही. बीएसएफच्या आणि इतर पॅरामिलिटरीच्या या लोकांनी देशासाठी बलिदान दिल्याने आज भारताने जागतिक नकाशावर एक गौरवमय स्थान निर्माण केलं आहे. सीमा सुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा आहे. आपल्या समोर अनेक अडचणी आहेत, पण मला आपल्या जवानांवर पूर्ण विश्वास आहे. घुसखोरी, मानवी तस्करी, हत्यारांची तस्करी, ड्रोन हल्ला असे अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत. पण या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले जवान सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सीमा सुरक्षा बलाचा हा पुरस्कार सोहळा 2003 पासून साजरा करण्यात येत आहे. बीएसएफचे पहिले महानिदेशक आणि पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित केएप रुस्तमजी यांच्या जन्म दिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. यावर्षीच्या 18 व्या पुरस्कार सोहळ्यात एकूण 27 पुरस्कार देण्यात आले असून त्यामध्ये 14 वीरता पुरस्कार आणि 13 पोलीस पदके प्रदान करण्यात आलीत.