काव्यगत न्याय

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काव्यगत न्याय

जेआरडी टाटा यांनी एक छोटीशी विमान कंपनी सुरू केली, तेव्हा ती देशाची पहिली प्रमुख विमान कंपनी होईल आणि सरकार ती घशात घालेल आणि त्यानंतर ती पुन्हा आपल्या कंपनीच्या ताब्यात येईल, याचा विचार आपल्या हयातीत कधीच केला नसेल. जेआरडी यांना भारताच्या औद्योगिक क्रांतिचे श्रेय जाते. याच सीनियर टाटांनी एक विमान कंपनी बनवली होती आणि त्यांनी विमाने आणून देशात पहिली हवाई सेवा देण्यास सुरूवात केली. ते साल होते १९३२ जेव्हा देशाच्या अनेक क्षेत्रांत  खूप काही घडायचे होते. टाटा एअरलाईन्स ही ती कंपनी. पहिले उड्डाण स्वतः टाटांनी मुंबई ते कराची असेही केले होते. स्वातंत्र्य तर दृष्टिपथातही नव्हते आणि सरकारी विमान कंपनी हा प्रकारही कुणी ऐकला नव्हता. तेव्हा टाटांनी सुरू केलेली विमान कंपनी सुरू झाली. इतका जाज्वल्य इतिहास असलेली कंपनी सरकारच्या ताब्यात आल्यावर नोकरशाहीने तिचा बळी घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालिन काँग्रेस सरकारच्या मनात कंपन्या चालवण्याचे आले कारण ते दिवस भारताच्या उभारणीचे होते. पहिले पंतप्रधान नेहरू यांनी औद्योगिक विकासाचा पाया घातला आणि रफी अहमद किडवाई या मंत्र्यांच्या नादाला लागून टाटांची कंपनी देशाच्या गळ्यात घातली. काही वर्षे टाटांनाच अध्यक्ष ठेवले. हीच पहिली विमान कंपनी जिचे नाव होते एअर इंडिया. आता ही पुन्हा टाटा सन्सच्या मालकीकडे म्हणजे पुन्हा टाटांकडेच आली आहे. पुन्हा टाटांकडून ही कंपनी टाटांकडेच आली आहे. यालाच काव्यगत न्याय असे म्हणतात. केंद्रिय मंत्रिमंडळाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. टाटा सन्स ही संपूर्ण टाटा समूहाची प्रमुख कंपनी आहे. मुळात एअर इंडिया टाटांची असताना नेहरूंच्या काळात जे सरकारीकरणाचे खूळ माजले होते, त्याचा फटका एअर इंडियालाही बसला.  किडवाई यांच्या आग्रहाखातर नेहरूंनी ही कंपनी सरकारच्या घशात घातली आणि मग तिचे नष्टचर्य सुरू झाले. कंपनी ही सरकारी झाली म्हणजे सरकारी बाबू लोक, मंत्रि आणि खासदार यांना खानपान सेवा देण्यासाठीच आहे, असा काहीतरी गैरसमज पसरला होता. त्यामुळे सार्या मंत्र्यांनी केवळ  ऐश केली आणि यातून एअर इंडियावर कर्जाचा बोजा चढला. ५० हजार कोटी रूपयांचे कर्ज आणि प्रचंड तोटा यात कंपनी चालणे शक्यच नव्हते. एअर इंडिया म्हणजे मंत्र्यांच्या दौर्यांसाठीच आहे, अशी कल्पना करून फुकट्या मंत्र्यांनी कंपनीला गाळात घातले. त्यात प्रफुल पटेल यांनी एअर इंडियाच्या गळ्याला नखच लावायचे असे ठरवले होते. त्यांनी खासगी कंपन्यांना प्रोत्साहन दिले. एका अर्थी तो निर्णय पूर्णपणे चुकीचा होता, असे म्हणता येणार नाहि. कारण एअर इंडियाबद्दल सामान्य प्रवाशांच्या खूप तक्रारी होत्या. खासगी कंपन्यांची चकचकीत विमाने, आकर्षक पोषाखातील देखणे कर्मचारी आणि तत्पर सेवा असताना एअर इंडियाची जुनाट विमाने आणि मरगळलेला कर्मचारीवर्ग यामुळे लोक झपाट्याने खासगी कंपन्यांकडे वळले. अशा स्थितीत खासगी कंपन्यांनी एअर इंडियाची अवस्था उतारवयातील ज्येष्ठ नागरिकासारखी केली. मोदींच्या काळात कारखाने चालवण्याऐवजी ते विकून टाकण्याची सरकारची मनःस्थिती बनली. आणि तेच योग्य आहे. सरकारचे काम कंपन्या चालवणे नाहि आणि त्यांना ते जमणारही नाहि.  सर्व सार्वजनिक उपक्रम तोट्यात गेले ते सरकारचे आळशीपणा आणि निष्क्रियपणाचे धोरण आणि कर्मचार्यांची बेफिकिर आळशी वृत्तीमुळे. त्यामुळे एअर इंडियाचे लोढणे गळ्यातून काढून फेकून द्यायचे होते. पण घातलेल्या अटी इतक्या अनाकर्षक होत्या की एकही खरेदीदार तयार झाला नाहि. आता मात्र पुन्हा टाटा सन्सने ही कंपनी ताब्यात घेण्याचे ठरवले असल्याने कंपनीला उर्जितावस्थेत आणले जाण्याची शक्यता आहे. आता मात्र टाटा सन्सच्या ताब्यात आल्यावर ४००० देशांतर्गत आणि १८०० परदेशी पार्किंगची जागा कंपनीला मिळणार आहे. एअर इंडियाला तोटा सुरू झाला तो इंडियन एअरलाईन्समध्ये विलिनीकरण झाल्यानंतर. इंडियन एअरलाईन्सचे तोट्याचे मार्ग एअर इंडियाला करावे लागले आणि एअर इंडियाच्या लाभाचे मार्ग इंडियन एअरलाईन्सला फुकटात मिळाले. तेथपासून एअर इंडियाच्या –हासाला सुरूवात झाली. टाटांनी लावलेले रोप आता वृक्ष झाल्यावर पुन्हा त्यांच्याच अंगणात फुलणार आहे,  ही समाधानाची गोष्ट आहे. सध्या एअर इंडियावर ६०,०७४ कोटी रूपयांचे कर्ज असून खरेदीदार टाटा कंपनीला २२,२८६. ५० कोटी रूपये सरकारला द्यावे लागणार आहेत तर उर्वरित कर्जाचा भार केंद्र उचलणार आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर टाटांकडे कंपनीची मालकी जाईल. कर्मचारी कपात होणार का, कंत्राटी कर्मचार्यांची काय व्यवस्था होणार, आदी सारा तपशील पुढील बैठकांत निश्चित होईल. पण एका दिवाळखोर कंपनीला खासगी कंपनीने उर्जितावस्थेत आणल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्या यादीत कदाचित एअर इंडियाही असेल. भविष्याच्या गर्भात काय दडले आहे, ते कुणालाच माहित नाहि. पण कोविडोत्तर काळात पर्यटन क्षेत्रात आव्हाने निर्माण झाली आहेत. पर्यटकांची येजा कमी झाली आहे. त्यामुळे इतक्या अवघड काळात टाटांकडे एअर इंडियाची मालकी येणार आहे. आता ही टाटांचीच कसोटी आहे.