परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल रुजू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल रुजू

परभणी : पदनियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर पुनरस्थापना झाल्यानंतर गुरुवारी सकाळीच त्या परभणी येथे रुजू झाल्या. कार्यभार स्वीकारण्याची औपचारिकता पार पाडण्याऐवजी गोयल यांनी प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. आज  गुरुवारी (दि. ५) सकाळी साडे सात वाजता देवगिरी एक्सप्रेसने मुंबईहून त्या येथे पोहोचल्या. मंडळ अधिकारी व तलाठी या दोघांनी शिष्टाचाराप्रमाणे रेल्वेस्थानकावर त्यांचे स्वागत केले.

श्रीमती गोयल यांनी दिलेल्या सूचनेवरून स्वागतास कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने येणे टाळले. दरम्यान, श्रीमती गोयल यांनी कृषी विद्यापीठात भेट देऊन राज्यपाल यांच्या दौऱ्यासाठी सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली.  राज्यपाल येथे थांबणार असलेल्या विश्रामगृहाची पाहणी केली. राज्यपालांना देण्यात येणाऱ्या मानवंदना, कृषी महाविद्यालयातील सभागृह, नाहेप प्रकल्प, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. या वेळी पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, कुलगुरू डॉ.अशोक ढवण,  अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, प्राचार्य डी. एन.गोखले आदी उपस्थित होते. आज  जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीमती  गोयल यांचे दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.  या वेळी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रे स्वीकारल्यावर माध्यमांशी जिल्हाधिकारी गोयल यांनी संवाद साधला.जिल्ह्यातील सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सकारात्मक काम करण्यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.