महाराष्ट्र, गुजरातसहीत १२ राज्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली; केंद्र सरकार म्हणतं प्रसार मंदावला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्र, गुजरातसहीत १२ राज्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली; केंद्र सरकार म्हणतं प्रसार मंदावला

मुंबई :   केंद्र सरकारने सोमवारी काही राज्यांमधील करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र दिल्ली आणि महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमधील रुग्णसंख्या स्थिरावली असल्याचे प्राथमिक संकेत मिळत असल्याचं म्हटलं आहे. संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आङे. मात्र या विषयातील तज्ज्ञांनी करोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा फेटाळून लावलाय. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक हा १५ जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे.

आरोग्य मंत्राल्याचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना दिल्ली, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब, झारखंड आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये स्थिरता आल्याचे संकेत मिळत असल्याचं सांगितलं. बिहार, राजस्थान, हरयाणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे, असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ५० हजारांखाली

दिल्लीमध्ये २४ एप्रिल रोजी करोनाचे २५ हजार २९४ नवे रुग्ण आढळून आलेले. दोन मे रोजी हा आकडा २४ हजार २५३ इतका होता. याचप्रमाणे २४ एप्रिलला महाराष्ट्रात ६५ हजार ४४२ नवे रुग्ण आढळून आलेले. २० एप्रिलला हा आकडा ६२ हजार ४१७ होता तर तीन मे रोजी राज्यात ४८ हजार ६२१ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. मागील ३० दिवसांमध्ये पहिल्यांदाच हा आकडा ५० हजारांच्या खाली आळा आहे. छत्तीसगडमध्ये २९ एप्रिल रोजी १५ हजार ५८३ करोना रुग्ण आढळून आलेले तर दोन मे रोजी ही संख्या १४ हजार ८७ पर्यंत खाली आली. याचप्रमाणे दीव-दमण, गुजरात, झारखंड, लडाख, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून येत आहे.

तज्ज्ञांचं मत मात्र वेगळं

मात्र आरोग्य विषयक तज्ज्ञांनी करोनाची दुसरी लाट ओसरण्याची सध्या शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रामधील करोना लाटेसंदर्भात बोलताना टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर शाशांक जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच करोनाची दुसरी लाट मुंबईतून ओसरल्याची चिन्ह दिसत असली तरी त्याचा प्रभाव महाराष्ट्रात कमी होण्यास  २१ मे ते १५ जूनदरम्यानचा कालावधी लागेल असं म्हटलं होतं. देशातील अनेक राज्यांमध्ये आता रुग्णसंख्या वाढत असतानाच एवढ्या घाईघाईत संसर्ग ओसरण्यास सुरुवात झाल्याचं म्हणणं चुकीचं ठरेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. काही राज्यांमध्ये काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी अनेक राज्यांमध्ये ती वाढत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. लसीकरणाचा वेग मंदावला तर अनेक ठिकाणी तिसरी लाट येईल अशी भीतीही व्यक्त केली जातेय.