तुमच्या शिवसैनिकांना आवरा": गडकरींचे ठाकरेंना पत्र

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तुमच्या शिवसैनिकांना आवरा": गडकरींचे ठाकरेंना पत्र

नवी दिल्ली, : केंद्री सरकारद्वारे महाराष्ट्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या विकास कामात शिवसैनिक आणि नेते खोडा घालत असल्याचे खरमरीत पत्र केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. गडकरींनी पाठवलेल्या या लेटर बॉम्बची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार गडकरी यांनी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली असल्याबद्दल तीव्र संताप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पत्रात व्यक्त केला आहे. तसेच ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत असल्याचा इशारा देखील गडकरींनी आपल्या दिलाय. शिवसैनिकांच्या हस्तक्षेपामुळे अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामे वाहतुकीस धोकादायक ठरतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल अशी भिती गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

गडकरींच्या पत्रात नमूद केल्यानुसार राज्यातील अकोला आणि नांदेड या 202 किमीच्या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाची कामं चार टप्प्यांत सुरू आहेत. यात गेडशी ते वाशिम असं वाशिम शहरासाठी बायपास (लांबी 12 किमी) निर्माण करण्याचं काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, बायपास व मुख्य रस्त्याचं काम शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी थांबवले आहे. त्याचप्रमाणे मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचं काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने काम थांबवण्याची परवानगी मागितली आहे. पूलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचं काम (अंदाजे किंमत 135 कोटी) आम्ही हाती घेतले आहे. हे काम जवळपास पूर्ण झालेय. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसैनिकांनी थांबवले होते. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढंही सुरू ठेवावीत का..? याबद्दल आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत. ही कामे अर्धवट सोडल्यास वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. शिवसैनिकांचा उपद्रव असाच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचं आणि जनतेचे नुकसान होईल. लोकांच्या दृष्टीने आम्ही अपराधी ठरू. महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायम खंत राहील. ही कामे पुढं नेण्यासाठी आपण हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे गडकरींनी आपल्या पत्रात नमूद केलेय.