अधिवेशनाच्या तारखा ठरल्या; मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केला खुलासा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अधिवेशनाच्या तारखा ठरल्या; मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केला खुलासा

ओबीसी आरक्षणाबरोबरच पावसाळी अधिवेशनासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. या पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाचा कालवधी वाढवणार का या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक संस्थांच्या निवडणुका यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे.

“आपले पत्र २४ जून, २०२१ रोजी पत्र प्राप्त झाले. सदर पत्रामध्ये नमूद केल्यानुसार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनातील मुद्द्यांबाबतची वस्तुस्थिती”, असं म्हणत तीन महत्वाचे मुद्दे मांडलेत. यापैकी पहिल्याच मुद्द्यामध्ये त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या कालावधीसंदर्भात खुलासा केलाय. करोना कालावधीचं कारण देत अधिवेशन केवळ दोन दिवसांचं होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी केलाय.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक २२ जून २०२१ रोजी मुंबईमध्ये पार पडली. कोविड १९ मधील डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएटच्या संक्रमाणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केलेली चिंता आणि केंद्र सरकारने दिलेल्या सावधगिरीचा इशारा यावर बैठकीमध्ये सखोल विचार विनिमय करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. या चर्चेनंतर ृकेवळ ज्या कामकाज सल्लागार समितीला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्याचा अधिकार आहे त्याच समितीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करुन, सन २०२१ च्या द्वितीय म्हणजेच पावसाळी अधिवेशनाचा कालावधी ५ जुलै ते ६ जुलै २०२१ असा निश्चित केलेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सांगितलं आहे. या नवीन निर्णयासंदर्भातील कारण देताना करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्याचंही नमूद करण्यात आलंय. “मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून इच्छितो की, राज्यामध्ये सध्या असलेली करोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचीही तीव्र शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी केवळ आपल्या राज्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशाबाबत व्यक्त केलेली आहे. संभाव्य अशा तिसऱ्या लाटेच्या दाहकतेबाबत देखील या तज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे,” असं मुख्यंत्र्यांनी म्हटलंय.