..तर मराठा आरक्षणप्रश्नी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

..तर मराठा आरक्षणप्रश्नी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सातारामराठा आरक्षणप्रश्नी मागण्या पूर्ण करा अन्यथा पुढील गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा छत्रपती उदयनराजेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले आहे.

 

पत्रात उदयनराजेंनी म्हटले आहे की, मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गंभीर होत चालला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी 'मराठा' असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र 'खराटा' येत आहे हे वेळेवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.

 

तात्पुरत्या दिलासासाठी इतर मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी!

 

चाळीस वर्षांचा काळ लोटला तरी मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे आरक्षणाचा ठोस निर्णय लागेपर्यंत मराठा समाज या मागणीपासून कदापी मागे हटणार नाही. जसे इतर समाजाला आरक्षण दिले तसेच आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे, यात शंका नाही. आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे. त्यामुळे 'दूध का दूध पानी का पानी' होईल. मात्र हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात येईपर्यत समाजाच्या इतर मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी, जेणेकरून समाजाला तात्पुरता दिलासा मिळेल.

 

...तर मराठा समाज आश्वस्त होईल!

 

किमान पुढची पाऊले उचलताना मराठा समाज आश्वस्त होईल, अशी सरकारची भूमिका असली पाहिजे. विशेषत: न्या. भोसले समितीने ज्या काही बाबी सूचविल्या आहेत, त्यानुसार तातडीने पुढची पाऊले उचलली गेली पाहिजेत. तसेच राज्य मागासवर्ग आयोगात मराठा आरक्षणाचा प्रश्न समजणारे तज्ञ सदस्यांचा समावेश करून, त्यांचे उपसमूह तयार करून न्या. भोसले यांनी जे 'टर्म्स अँड रेफ्रन्स' सांगितले आहेत, त्याप्रमाणे 'एम्पिरिकल डेटा' तयार करावा. या बाबी त्वरित झाल्या पाहिजेत, असे उदयनराजेंनी म्हटले आहे.