मुंबईसह कोकण पट्ट्यात धो-धो : रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईसह कोकण पट्ट्यात धो-धो : रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई, : जून महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यभरात पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत रस्ते आणि रेल्वे जलमय झाली. त्याचा परिणाम वाहतूक संथगतीने आणि काही प्रमाणात विस्कळीत होण्यावर झाला. दरम्यान, पुढील ४८ तास जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दीड ते दोन फूटांपर्यंत अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. यामुळे दुचाकी आणि चारचाकी पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली.

मुंबईतील अंधेरी सबवे, सायन गांधी मार्केट, हिंदमाता, चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, सायन, वडाळा, वांद्रे, सांताक्रुझ परिसरातील सखल भागात पाणी जमा झाले होते. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. धीम्या मार्गावरील रुळांवर पाणी साचल्याने त्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.

कुर्ला-विद्याविहार स्थानकांमध्ये धीम्या गतीच्या रूळांवर पाणी
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांमध्ये धीम्या गतीच्या रूळांवर पाणी साचले. यामुळे रेल्वे २०-२५ मिनिटे उशीराने धावत होत्या. याचप्रमाणे काही गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या.

कोकणातही दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत
दुसरीकडे कोकणातील ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात पहाटेपासून पावसाने पुन्हा जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू होती. रात्री पावसाने उसंत दिल्याने राजापूर कोदवली नदीला आलेला पूर ओसरला होता. त्यामुळे राजापूर बाजार पेठेचा धोका टळला. जिल्ह्यातील सर्वच नद्यांमधील पाणी काहीसे ओसरले होते.

सिंधुदुर्गात गेले चार दिवस बरसणाऱ्या पावसाने निर्मला नदीला पूर आल्याने २७ गावांचा संपूर्ण तुटला आहे. दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यातील अनेक कॉजवे पाण्याखाली गेलेत. मसुरे पंचक्रोशीत जनजीवन विस्कळीत झाले. रमाई नदीची पाण्याची पातळी वाढल्याने मालवण बेळणे कणकवली मार्गावरील बागायत येथे पुराचे पाणी थेट बागायत तिठा बाजारपेठेजवळ पोहोचले. वडाचापाट गोळवण मार्गावर वडाचापाट इथे तर पोईप धरणावर पाणी असल्याने हा मार्ग सुद्धा वाहतुकीस बंद झाला आहे.

जळगावात बैलगाडी वाहून गेली, बैलांचा मृत्यू
जळगावात मुसळधार पावसात नाल्याला अचानक आलेल्या पुरात एक बैलगाडी वाहून गेली. यात बैलांचा मृत्यू झाला तर शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला. शेतकऱ्याच्या पत्नीला वाचवण्यात यश आले आहे. धरणगाव तालुक्यात निमभोरा गावात ही घटना घडली.