…किमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा,” ICMR च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

…किमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा,” ICMR च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केलं आहे. काही राज्यांमध्ये जिल्हास्तरावर लॉकडाउनचा निर्णय घेतला जात असून नागरिकांवर निर्बंध आणले जात आहे. दुसरीकडे देशातही लॉकडाउन लावला जावा अशी मागणी काही राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

करोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन ठेवला पाहिजे असं मत बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणीमध्ये संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे आहे तिथे लॉकडाउन लावण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. सध्या भारतातील ७१८ जिल्ह्यांपैकी भारताच्या तीन चतुर्थांश भागात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई तसंच बंगळुरुचा समावेश आहे. बलराम भार्गव यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने करोनाला रोखण्यासाठी आधीच अनेक ठिकाणी लागू करण्यात आलेला लॉकडाउन किती काळ असला पाहिजे यावर भाष्य केलं आहे.

दरम्यान एकीकडे दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असल्याने देशात लॉकडाउन जाहीर केला जावा अशी मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र त्यासाठी इच्छुक नाही. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता केंद्राने लॉकडाउनचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, केरळ, नवी दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.