उत्परिवर्तित विषाणूची रचनात्मक प्रतिमा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

उत्परिवर्तित विषाणूची रचनात्मक प्रतिमा

नवी दिल्ली : ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांना बी १.१.७ या उत्परिवर्तित विषाणूची रचनात्मक प्रतिमा मिळवण्यात यश आले आहे. सार्स सीओव्ही २ या विषाणूचा हा प्रकार असून सध्या उपलब्ध असलेल्या लशी या विषाणूमुळे होणारा सौम्य व गंभीर संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता अधिक आहे.

बी १.१.७ हा करोनाचा सर्वात संसर्गजन्य असा प्रकार मानला जातो. तो प्रथम ब्रिटनमध्ये डिसेंबर २०२० मध्ये सापडला होता.  त्यामुळे भारत व कॅनडासह अनेक देशांत करोना रुग्णांची संख्या वाढली होती.

ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचे प्रा. डॉ. श्रीराम सुब्रमणियम यांनी म्हटले आहे की, या विषाणूची जैवरासायनिक व रेणवीय प्रतिमा मिळवण्यात यश आले असून हा विषाणू सुईच्या टोकाच्या १ लाख पट लहान आहे. ही प्रतिमा व विषाणूचा आकार समजण्यासाठी क्रायो इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करण्यात आला.  त्यांनी सांगितले की, बी १.१.७ विषाणूत अनेक उत्परिवर्तने झालेली असून एन ५०१ वाय असे या उत्परिवर्तनाचे स्वरूप आहे. ते उत्परिवर्तन काटेरी प्रथिनात झाले आहे. त्या काटेरी प्रथिनाच्या मदतीने हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. हे स्थानिक उत्परिवर्तन असून त्याचा प्रतिमाचित्रणाच्या माध्यमातून प्रथमच उलगडा झाला आहे. एन ५०१ वाय हे उत्परिवर्तन बी १.१.७ विषाणूच्या काटेरी प्रथिनाच्या एसीइ २ रिसेप्टरच्या ठिकाणी असल्याने धोकादायक ठरत आहे.

सध्याच्या लशींची परिणामकारकता

या विषाणूवर सध्याच्या लशीच्या परिणामकारकतेबाबत  डॉ. श्रीराम सुब्रमणियम सांगितले की, एन ५०१ वाय उत्परिवर्तनात विषाणू पेशीला चिकटून तो सहज पेशीत प्रवेश करतो हे खरे असले तरी सध्या ज्या लशी आहेत त्यामुळे जे प्रतिपिंड निर्माण होतात त्यामुळे उत्परिवर्तित विषाणूलाही अटकाव केला जाऊ शकतो.

प्रतिमाचित्रणाचा उद्देश

यूबीसीतर्फे यापुढे कोविड १९ विषाणूच्या पी.१ (ब्राझिलियन), बी .१.३५१ (दक्षिण आफ्रिकन), बी.१.४२७/बी.१.४२९ (कॅलिफोर्नियन), बी.१.६१७ (भारतीय) विषाणूंचे प्रतिमाचित्रण केले जाणार आहे. विषाणूंवर मात करण्यासाठी त्यांची रेणवीय रचना समजणे आवश्यक असते. त्यातून कुठल्या उपचारांच्या मदतीने या विषाणूंवर इलाज करता येईल याची पुरेशी माहिती हाती येते. त्यामुळे प्रतिमाचित्रण करणे महत्त्वाचे ठरते, असे सुब्रमणियम यांनी सांगितले.