जालन्यात शासकीय प्रादेशिक मनोरुग्णालय उभारणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जालन्यात शासकीय प्रादेशिक मनोरुग्णालय उभारणार

जालना : जालना येथे शासकीय प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यात येणार आहे. ३६५ खाटांच्या या रुग्णालयासाठी १०४ कोटी ४४ लाख रुपये अंदाजित खर्च अपेक्षित असल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या राज्यात पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी या चार ठिकाणी शासकीय प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. मराठवाडा प्रादेशिक विभागात अशा प्रकारचे एकही रुग्णालय नसल्याने या भागातील मानसिक रुग्णांच्या उपचारासाठी गैरसोय होत असते. ही गैरसोय टाळण्यासाठी मराठवाडा विभागासाठी जालना येथे प्रादेशिक रुग्णालय उभारण्यासाठी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, यंत्रसामुग्री, रुग्णवाहिका, औषधी, मनुष्यबळ यासाठी अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले.

मराठवाडा विभागातील मनोरुग्णांच्या उपचारासाठी अधिक अंतर असलेल्या नागपूर आणि पुणे येथील शासकीय मनोरुग्णालयात सध्या जावे लागते. जालना येथील शासकीय रुग्णालय परिसरात अथवा भाडेतत्त्वावर जागा घेऊन सध्या हे मनोरुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती तसेच यंत्रसामुग्री तातडीने उपलब्ध करवून देण्यात येणार आहे. त्यामध्ये बाह्य आणि आंतररुग्ण विभाग, इसीटी विभाग, संगीत उपचार, योग इत्यादींचा समावेश असेल. चाचणी प्रयोगशाळा आणि समुदेशन विभागाची व्यवस्था या रुग्णालयात असणार आहे. मराठवाड्यात शासकीय मनोरुग्णालय नसल्यामुळे मानसिक आजाराचे योग्य निदान करणे कठीण जाते. त्यामुळे मराठवाड्यात प्रादेशिक मनोरुग्णालय उभारणीसाठी आपण प्रयत्नाशील होतो, असे टोपे यांनी सांगितले.

कर्करोग रुग्णालय उभारणार

जालना येथील शासकीय कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीच्या संदर्भात अर्थसाह््य उपलब्ध करण्याच्या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता यांच्याशी चर्चा केली. मुंबई येथील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या सहकार्याने जालना येथे अलीकडेच कर्करोग निदानाच्या संदर्भात बाह््य उपचार केंद्र सुरू करण्यात आले. त्यावेळी बोलताना टोपे यांनी राज्य शासन आणि उद्योजकांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून कर्करोग उपचारासाठी जालना येथे कोबाल्ट युनिट उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.

दहा जिल्ह्यांना लाभ

जालना येथील नियोजित शासकीय मनोरुग्णालयाचा लाभ मराठवाडा आणि लगतच्या विदर्भातील एकूण दहा जिल्ह्यांना होणार आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत मराठवाड्यासाठी स्वतंत्र प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन जीवनातील वाढत्या ताण-तणावांमुळे समाजातील मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्ना आहे. –राजेश टोपे, आरोग्यमंत्री